Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात कपाशीवर संकट, पाऊस नसल्यानं पिके कोमेजली, शेतकरी चिंतातुर
Ahmednagar News : दक्षिण अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस (Heavy Rain) झालेला नाही.
अहमदनगर : दक्षिण अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्यापही दमदार पाऊस (Heavy Rain) झालेला नाही. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात पाऊस नसल्याने कपाशीच्या (Cotton) पिकांनी माना टाकायला सुरुवात झाली आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेतो की काय, या चिंतेने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
नाशिकसह (Nashik) धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर आदी जिल्ह्यातही पावसाने ओढ दिली असून (Rain Update) अनेक भागात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नसल्याने नद्यांना पहिला पूरसुद्धा आलेला नाही. अशातच सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी पिकांची लागवड केली असून त्यातच पाऊस गायब असल्याने अनेकपिके कोमेजून जाऊ लागली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात कपाशीचे पीक घेतले जात असल्याने सध्या पावसाने दडी मारल्याने कापूस पीक करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी (Farmers) चिंतेत असून पुढील काही दिवसांत जोरदार पाऊस नसल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
शेवगाव तालुक्याचा पूर्व भाग पांढऱ्या सोन्याचे आगर म्हणून ओळखला जातो. बोधेगाव कृषी मंडळात 17 हजार 730 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड झाली आहे. यात सर्वाधिक 15 हजार 289 हेक्टर क्षेत्रावर कपाशी आहे. मात्र, पावसाळा सुरू होऊन एवढे दिवस झाले तरीही दक्षिण नगर जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे कपाशी, तूर, सोयाबीन आणि इतर पिकं सुकायला लागले आहे. शेवगाव तालुक्यातील बोधेगाव, बालमटाकळी, सुकळी, लाडजळगाव, हातगाव, कांबी,मुंगी, पिंगेवाडी, खामपिंपरी, चापडगाव, अंतरवली, शिंगोरी, राणेगाव, अधोडी, , दिवटे या भागांत मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेण्यात येते. गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून हा पेरा वाढत आहे.
दरम्यान, चालू खरीप हंगामात कर्ज काढून महागडे बियाणे खरेदी करीत शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. रिमझिम पावसावर कपाशी उगवून आली. मात्र पावसाला एक महिना विलंब झाल्याने कपाशीला बाळसे येण्यासाठीच्या वेळेतच पीक कोमेजून जाऊ लागले आहे. तर काही भागात शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने पीक जळून जाण्याच्या मार्गावर त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांच्या पिकांनी काहीशा तग धरला आहे पण येत्या चार पाच दिवसात पाऊस आला नाही तर त्यांचेही कपाशी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नाशिक विभागात पावसाचा जोर कमीच
नाशिक जिल्ह्यात तर अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यातील बहुतांश भाग तहानलेला असून सुरवातीच्या पावसावरच शेतकऱ्यांनी भात आवणीसह इतर पिकांची पेरणी केली. मात्र आता सध्या पावसाच्या रिमझिमशिवाय दमदार पाऊस नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. दुसरीकडे धुळे, जळगाव, नगर भागातही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी संकटात सापडला असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दिसून येऊ लागले आहेत.
इतर महत्वाची बातमी :