Maharashtra Assembly Elections 2024 : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
Kopargaon Assembly Constituency : आशुतोष काळे यांनी आपली उमेदवारी गृहीत धरत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे विवेक कोल्हे अद्यापही कुठलाही निर्णय घेऊ शकले नाहीत.
अहिल्यानगर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीत (Mahayuti) आल्यानंतर भाजपातील राजकीय परिवाराची राजकीय कोंडी झालेला मतदारसंघ म्हणजे कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. काळे आणि कोल्हे ही पारंपारिक लढाई असलेला कोपरगाव विधानसभा मतदारसंघ (Kopargaon Assembly Constituency) असून यावेळी मात्र दोघेही महायुतीत असल्याने उमेदवारीवरून पेच निर्माण झाला आहे.
अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांनी आपली उमेदवारी गृहीत धरत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे (Snehlata Kolhe) आणि विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे मात्र अद्यापही कुठलाही निर्णय घेऊ शकले नाहीत.
कोल्हे तुतारी घेणार की मशाल?
काही महिन्यांपूर्वी विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांच्या गाडीतून एकत्र प्रवास केल्याने तुतारी हाती घेण्याची चर्चा रंगली होती. विवेक कोल्हे यांच्यासमोर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना हे दोन पर्याय आहेत. यातील कोणता पर्याय ते निवडणार? हे आगामी काळात स्पष्ट होईल. शरद पवार गटाकडून जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांचे नाव देखील चर्चेत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राजेंद्र झावरे हे देखील विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे यावेळी कोपरगाव विधानसभेत काळे विरुद्ध कोल्हे लढत झाली तर कोल्हे हाती तुतारी घेणार की मशाल हे पाहणं महत्त्वाचं असेल.
पेच सोडवण्यासाठी स्वत: फडणवीस मैदानात
दरम्यान, काळे आणि कोल्हे या कुटुंबात अनेक वर्षांपासून राजकीय अस्तित्वाची लढाई सुरु आहे. यावेळी काळे आणि कोल्हे दोघेही महायुतीत आहेत. कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल हे अद्यापही स्पष्ट नाही. काळे आणि कोल्हे यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक जण विधानसभेसाठी इच्छुक आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा पेच सोडवण्यासाठी स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना त्यांनी चर्चेसाठी बोलावले आहे. येथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी शेती पाण्याचा प्रश्न विधानसभेतील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायदा यावर देखील या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चा होणार आहे. आता कोल्हे नेमके कोणत्या पक्षात जाणार? की ते निवडणुकीतून माघार घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
कोपरगाव गोळीबार प्रकरण, अजित पवार गटाच्या आमदारावर गंभीर आरोप, भाजप नेत्याने थेट दाखवलं 'ते' स्टेटस