Ahmednagar: शिक्षित तरुणाने पंजाबमधील आधुनिक पद्धत वापरुन सुरू केला दूध व्यवसाय; महिन्याला मिळवतो दीड लाखांपर्यंत नफा
Ahmednagar News: पाथर्डीच्या शिक्षित तरुणाने पंजबामध्ये जाऊन आधुनिक गोठ्यांचे निरीक्षण केले आणि तीच प्रणाली घरच्या गोठ्यासाठी वापरली. त्याद्वारे दूध व्यवसाय सुरू केला असून त्याला लाखोंचा नफा मिळतोय.
Maharashtra: अहमदनगरच्या (Ahmednagar) पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा कायमचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील तरुणांच्या हातात पदव्या असूनही नोकऱ्या नाहीत. पण नोकरी मिळेना म्हणून नाराज न होता, प्रयत्न, जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर दगडवाडीच्या तुळशीदास शिंदे या तरुणाने दूध धंदा (Milk Business) करुन जणू आपले आयुष्यच बदलून टाकले. विशेष म्हणजे दूध धंद्यात यांत्रिकीकरणाचा वापर वाढवण्यासाठी त्याने थेट पंजाबमध्ये (Punjab) जाऊन अभ्यास केला, आता शास्त्रोक्त पद्धतीचा गोठा उभारल्याने त्याचे श्रम वाचत आहेत.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात गर्भगिरी डोंगराच्या कुशीत अनेक लहान-मोठी गावं वसलेली आहेत. अशाच करंजीपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दगडवाडी गावातील तुळशीदास शिंदे या तरुणाने उच्च शिक्षण घेऊन पदवी तर मिळविली, पण नोकरीच मिळेना म्हणून हताश न होता दूध धंदा करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी त्याने 10 दिवस पंजाबमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोट फार्मला (Goat Farm) भेट दिली, त्याचा अभ्यास केला आणि तिथल्या पद्धतीने गोठा उभारला.
या गोठ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा गोठा दोन भागात विभागाला आहे, दोन्ही बाजूने गायींना उभे राहण्याची व्यवस्था आहे. दोन्ही भागांमध्ये 15 फूट अंतर सोडून त्यात दीड-दीड फुटांच्या गव्हाणी बनवण्यात आल्या आहेत, तर गव्हाणीच्या मधून एक ट्रॅक्टर जाईल एवढी जागा आहे, त्यामुळे जनावरांसाठी लागणारा चारा थेट ट्रॅक्टरवरून गोठ्यात आणला जातो, त्यामुळे बरेच श्रम वाचतात.
आज तुळशीदास शिंदे यांच्याकडे लहान-मोठ्या 32 गायी आहेत. त्यात डेन्मार्क, जरशी, एचएफ, एबीएस अशा नामांकित जातीच्या गायी आहेत. दररोज 250 लिटर दुधाचे संकलन ते करतात. महिन्याला गायांचा खर्च वजा करता तुळशीदास शिंदे यांना एक ते दीड लाखांचा नफा मिळत असल्याचे त्यांचे वडील मारुती शिंदे सांगतात.
त्यांच्या या कामात त्यांच्या पत्नी राजश्री तुळशीदास शिंदे तसेच मुलगा गिरीश आणि आदित्य हे देखील मदत करतात. मागील 21 वर्षांपासून शिंदे कुटुंबीय पशुपालनाचा व्यवसाय करतात. पूर्वी पारंपरिक पद्धतीने पशुपालन करताना त्यांना अधिक श्रम पडत होते, मात्र यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने त्यांचा वेळ आणि श्रम वाचत आहेत.
तुळशीदास शिंदे यांनी गोठ्यात दोन्ही बाजूने अशा पद्धतीने लोखंडी जाळ्या बसवल्या आहेत की, त्यामुळे गायांचे डोके त्या जाळीत अडकले जाते. जेव्हा जनावरांना खाद्य टाकले जाते तेव्हा गायी गव्हाणीपर्यंत पोहोचू शकतात, इतर वेळी त्या गव्हाणीत येऊ शकत नाही, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याची नासधुस होत नाही, एकाच गव्हाणीत पाणी आणि चारा टाकला जातो, तसेच स्वच्छता करणं देखील सोपं जातं.
शिंदे यांनी अभ्यासपूर्वक गोठा बनवला, तसंच दूध काढण्यासाठीही ते यंत्राचा वापर करतात, त्यामुळे पतीपत्नी तासाभरात कमी कष्टाने 250 लिटर दुध काढू शकतात. शिंदे यांनी आपल्या सहा एकर शेतीत जनावरांसाठी चारा केला आहे, तसेच एक ट्रॅकरवर चालेल असं कुट्टी मशीन त्यांनी घेतलं आहे, शिंदे हे गायींना आवश्यकतेनुसार प्रमाणबद्ध चारा देतात.
तुळशीदास शिंदे यांनी पंजाबमधून तीन गायी आणल्या आहेत, सुरुवातीला त्यांना महाराष्ट्रातील वातावरण मानवत नव्हतं, मात्र योग्य काळजी घेत त्यांनी या गायींचं संगोपन केलं. तुलनेत अधिक उत्पन्न आणि कमी खर्च असल्याने भविष्यात पंजाबमधील आणखी गायी आणणार असल्याचं शिंदेंनी सांगितलंय.
हेही वाचा: