Shirdi : अल्पवयीन मुलगी गरोदर; लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा वडिलांचा आरोप, आरोपींमध्ये आईचाही समावेश
Ahmednagar : श्रीरामपूर येथील एक अल्पवयीन मुलगी गरोदर झाली आहे, धक्कादायक बाब म्हणजे, हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप त्या मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Shirdi Shrirampur Latest News Update : श्रीरामपूर येथील एक अल्पवयीन मुलगी गरोदर झाली आहे. या धक्कादायक घटनेमागे 'लव्ह जिहाद'चा प्रकार असल्याचा आरोप अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केला आहे.
चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीची विक्री करून धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप त्या मुलीच्या वडिलांनी केला आहे. ही मुलगी सात महिन्यांची गर्भवती असून प्रियकराच्या मदतीने आईनेच या मुलीची विक्री केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. वडिलांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
आठ वर्षापूर्वी अल्पवयीन मुलीच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नवाब लालाभाई शेख नावाच्या व्यक्तीने संबंध प्रस्थापीत केले. गेल्या अनेक वर्षांपासून या मुलीची आई आरोपी सोबतच राहत आहे. दरम्यानच्या काळात मुलीच्या वडिलांनी मुलीचा ताबा मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेत मुलीचा ताबा मिळवला होता. मात्र आईने मुलीला ताब्यात दिले नाही. अनेक वर्षानंतर आपली मुलगी त्यांना दिसली, मात्र त्यावेळी ती गर्भवती असल्याचं वडिलांच्या लक्षात आले. त्यानंतर वडिलांनी थेट न्यायालयात धाव घेत आपली कैफियत मांडली. अल्पवयीन पीडित मुलीच्या आईनेच आणि नवाब शेख यांनी या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून विक्री केल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे.
मुलगी अगदी बारा तेरा वर्षाची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले असल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. श्रीरामपूरातील ही एकमेव घटना नाही, या अगोदरही शेकडो घटना घडल्या असून सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची गरज आहे. हा सगळा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाब शेख आणि मुलीवर अत्याचार करणारा नजीम पठाण यास पोलीसांनी जेरबंद केले आहे. मुलीची आई देखील यात आरोपी असून पोलीस तिचाही शोध घेत आहेत. या अगोदरही श्रीरामपूर तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आमीष दाखवून, फूस लावून पळवून नेणे, अत्याचार करून गैरमार्गाला लावणे, धर्मांतर करणे असे प्रकार घडले आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरात मोठे रॅकेट कार्यरत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.