Ahmednagar: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, .... हा आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव
Radhakrishna Vikhe Patil: कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढणे म्हणजे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याची खंत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
Ahmednagar News: नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांनी खासगी कोचिंग क्लासेस सोबत संगनमत करून आपल्या महाविद्यालयात खासगी कोचिंग क्लासेस चालवायला देणे म्हणजे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या बाबुर्डी घुमट येथील नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कोचिंग क्लासेसचे प्रमाण वाढणे म्हणजे आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्याची खंत देखील विखे यांनी बोलतांना व्यक्त केली. एकीकडे शासन सांगतोय की आम्ही कमी पैशांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो. मात्र त्याच विद्यार्थ्यांना बाहेर एक ते दीड लाख रुपये फी भरून खासगी कोचिंग क्लासेसला जावं लागतंय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा आपल्या शैक्षणिक व्यवस्थेचा पराभव असल्यास देखील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मराठा समाज हा सरकारसोबत
मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झाला आहे. असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा प्रचार करणार नसल्याचा ठराव मराठा समाजाने घेतला आहे. सोबतच हजारोंच्या संख्येने उमेदवारी करण्याचा देखील निर्णय घेतला आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, हा केवळ हाइप केलेला विषय आहे. असं काहीही होणार नाही. मराठा आरक्षण दिल्याने मराठा समाज हा सरकारसोबत असल्याचा दावा त्यांनी केला.
मराठा समाजाची सरकार फसवणूक केली असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटल आहे, याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केला आहे. ज्यावेळी मराठा आरक्षण विधेयक मंजूर होत होतं, त्यावेळी ते सभागृहात होते. त्यावेळेस त्यांनी आपला विरोध दर्शवायला हवा होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करणं बंद केलं पाहिजे. सरकारने जे आरक्षण दिला आहे ते योग्य आहे. ते केवळ उद्या न्यायालयात टिकले पाहिजे यासाठी काम करणं गरजेचं असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले
भविष्यात भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना संधी कसे मिळेल
भाजपमधील लोकांनाच आता स्वतःसाठी पक्षात आरक्षण मागण्याची वेळ आली आहे. एवढ्या प्रमाणात बाहेरील नेत्यांना भाजपने स्वतःकडे घेतल आहे. अशी टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर केली होती. त्यांच्या या टीकेला विखे पाटील यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेब थोरात यांना आमच्याकडे येताना हाच विचार करावा लागणार आहे. जर भाजपच्या लोकांना आरक्षण देण्याची वेळ आली तर त्यांना संधी कशी मिळणार, याचा विचार त्यांनी केला पाहिजे असं प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे यांनी दिलंय. पक्षांतर्गत आरक्षणाचा मुद्दा त्यांना यासाठी सोडवायचा आहे, कारण ते भविष्यात भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना संधी कसे मिळेल असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
एआयसीटी आणि युजीसीच्या कार्यपद्धतीवर टीका
राधाकृष्ण विखे यांनी एआयसीटी आणि युजीसीच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय. त्यावेळी ते म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाचा विचार संबंधित यंत्रणेकडून होत नाही. केवळ त्यांना मिळालेल्या अधिकाराचा नियंत्रण ठेवण्यासाठीच ते उपयोग करत आहेत. त्यामुळे त्यांनी आपले कार्यपद्धती बदलायला हवी. असा सल्ला राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
कोण कुठे जात आहे याचा आम्हाला कोणताही फरक पडत नाही
शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या निमित्ताने महायुतीतील अनेक नेते हे विखेंचे राजकीय विरोधक समजले जाणारे निलेश लंके यांच्या स्टेजवर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महानाट्य हे दोन किंवा तीन अंकाचा असतं. त्यावरती आता पडदा पडला आहे. त्यामुळे कोण कुठे जात आहे याचा आम्हाला कोणताही फरक पडत नसल्याचा ते म्हणाले. शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याच्या स्टेजवर विखेंचे विरोधक हजेरी लावत आहेत त्यात आ. राम शिंदे, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे , शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे..त्यामुळे कुठेतरी महानाट्याच्या माध्यमातून विखेंचे विरोधक एकत्रित आणण्याचा निलेश लंकेचा प्रयत्न दिसतोय याबाबत बोलताना राधाकृष्ण विखेंनी हे उत्तर दिलं आहे. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसतय याबाबत आम्हाला चिंता नाही. येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार निवडून येईल, अशी आम्हाला खात्री आहे. असं देखील विखे म्हणाले
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई
सध्या राज्यात अनेक ठिकाणी गारपीट झाल्या असून त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाला आहे. याबाबत आम्ही संबंधित यंत्रणेला माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. याबाबत पंचनामे करण्याचे आदेश आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. यापूर्वी सततचा पाऊस हा आपल्या नियमात नव्हता तरीदेखील आम्ही त्याचे पंचनामे केले. आमचे सरकार आल्यापासून 14,000 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना दिलेत. त्यामुळे सध्याचे गारपिटीमुळे नुकसान झाले आहे, त्याचे देखील नुकसान भरपाई दिली जाईल.असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या