(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shirdi News : मिरवणुकीतून नवरदेव मांडवाच्या दाराशी आला अन् पोहोचला थेट पोलीस ठाण्यात, राहातामधील घटना
Shirdi News : नवरदेव वाजत गाजत मांडवात येणार त्यापूर्वीच त्याला थेट पोलीस ठाण्यात जाण्याची वेळ आल्याची घटना शिर्डीजवळील राहाता शहरात घडली आहे.
Shirdi News : नवरदेव वाजत गाजत मांडवात येणार त्यापूर्वीच त्याला थेट पोलीस ठाण्यात (Police Station) जाण्याची वेळ आल्याची घटना शिर्डीजवळील (Shirdi) राहाता (Rahata) शहरात घडली आहे. लग्न (Marriage) लागण्याआधीच नवऱ्या मुलाचे (Groom) कारनामे समोर आल्यानंतर मुलीकडच्या मंडळींनी दुसरा नवरदेव शोधत मुलीचे (Bride) लग्न लावून दिले. या अनोख्या लग्नाची मोठी चर्चा शहरात दिसून आली.
नवरदेव वाजतगाजत लग्नमंडपात पोहोचला आणि ....
शिर्डीजवळील राहाता इथल्या एका मुलीचा विवाह नाशिक (Nashik) शहरात राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता. 21 मे रोजी राहाता इथल्या एका मंगल कार्यालयात (Wedding Hall) या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्नघटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाईक आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहोचला. मात्र तो बोहल्यावर चढण्याआगोदरच त्याची पूर्वीची प्रेयसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहोचली. पंकजने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे तिने सांगताच विवाहस्थळी एकच खळबळ उडाली. पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तिच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ विवाहास नकार देत हा विवाह रद्द केला. राहाता पोलिसांनी पंकजला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तक्रारीपूर्वी करवले, करवल्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता.
नवरदेवाविरोधात गुन्हा, नाशिक पोलिसांच्या ताब्यात
26 वर्षीय उच्चशिक्षत पीडितेच्या फिर्यादीवरुन पंकज याच्यावर भादंवि कलम 376 (बलात्कार) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला देखील नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. विवाहस्थळी काही अनर्थ नको म्हणून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्याचवेळी नवरदेवाकडून आलेल्या वऱ्हाडींनी मंगलकार्यालयातून काढता पाय घेतला.
नवरीमुलीचा त्याच मंडपात नात्यातील मुलासोबतच विवाह
दरम्यान मुलीकडच्या मंडळींनी हा प्रकार समोर आल्यानंतर नात्यातीलच एका मुलाशी आपल्या मुलीचा विवाह (Wedding) आहे त्याच मंडपात लावून दिला आहे. शोधलेला नवरदेव मोठ्या मनाने पुढे आला. उपस्थित वऱ्हाडी मंडळींच्या साक्षीने या मुलीचा विवाह दुसऱ्या नवरदेवासोबत लावण्यात आला. मात्र ऐनवेळी जर हा सगळा प्रकार समोर आला नसता तर मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहिलं नसतं हे मात्र नक्की.