
Ahmednagar : अखेर 'रयत'च्या दादा पाटील महाविद्यालयात 'लावणी' झालीच, आयोजक म्हणाले, भाजपचं आक्षेप बिनबुडाचा
Ahmednagar : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दादा महाविद्यालयात आयोजित महाराष्ट्राची लोकधारा लावणी हा कार्यक्रम पार पडला आहे.

अहमदनगर : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात दादा महाविद्यालयात आयोजित केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा लावणी (Lavani Programme) हा कार्यक्रम पार पडला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेत कार्यक्रम करू नये अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. मात्र शांततेत हा कार्यक्रम पार पडला आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे (NCP) कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतच्या रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात 'महाराष्ट्राची लोकधारा लावणी' चा कार्यक्रम पार पडला. मात्र या कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आक्षेप घेत याबाबत सोशल मीडिया (Social Media) मधून पोस्ट देखील व्हायरल केली होती. दादा पाटील महाविद्यालयामध्ये एक आठवड्यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात डांबून ठेवल्याचा आरोप सचिन पोटरे यांनी केला होता. मग जर महाविद्यालयात जय श्रीरामच्या (Jai Shriram) घोषणा चालत नाहीत तर लावणीचा कार्यक्रम कसा चालतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महिलांची देखील उपस्थिती मोठ्या संख्येने होती. दरम्यान, लोककला या जपल्या पाहिजेत आणि सहकुटुंब पाहण्यासारखा हा कार्यक्रम आम्ही ठेवला असल्याचं आमदार रोहित पवार मित्र मंडळाचे सदस्य आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विशाल मेहेत्रे यांनी म्हटल आहे. तर दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर यांनी आम्ही रीतसर आणि नियमानुसार हे सभागृह कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिल्याचे म्हटले आहे. सोबतच विद्यार्थ्यांना डांबून ठेवण्याचा आरोप चुकीचा असल्याचा देखील त्यांनी म्हटले आहे. कॉलेजमध्ये सर्व धर्माचे विद्यार्थी-विद्यार्थिनी असतात. त्यामुळे येथील वातावरण बिघडवू नये, त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ सूचना दिली होती की महाविद्यालय परिसरात किंवा महाविद्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये जय श्रीराम त्या घोषणा देऊ नये, एखाद्या धार्मिक स्थळावर आपण घोषणा दिल्या तर हरकत नाही, या सूचना देताना त्यांना स्टाफ रूममध्ये बोलवण्यात आलेलं होतं, त्याला डांबून ठेवणे असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचं प्राचार्य नगरकर यांनी म्हटले आहे.
कॉलेज प्रशासनावर कारवाईची मागणी
दरम्यान या कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकधारा, लोक रंग, लावणीचा प्रवास, ढोलकी व लावणीच्या प्रात्यक्षिकांसह सादरीकरण करण्यात आले. अस्सल मराठमोळ्या लोककलेचा देवघरापासून ते फडापर्यंतचा वाटचालीचा उलगडा या कार्यक्रमातून झाल्याचे आयोजकांनी म्हटलं आहे. तर महाविद्यालय परिसरातील सभागृहामध्ये लावण्याचा कार्यक्रम ठेवणे योग्य नसल्याचे म्हणत याबाबत शासनाने महाविद्यालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी सचिन पोटरे यांनी केली आहे. रयत शिक्षण संस्थेचे महाविद्यालय हे राजकारणाचा अड्डा बनल्याचेही त्यांनी म्हंटले आहे एकूणच या लावणी कार्यक्रमावरून चांगलेच राजकारण रंगले आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
