Ekda Kaay Zala Movie Review : बाप मुलाच्या नात्याची 'बाप' गोष्ट
Ekda Kaay Zala Movie Review : जगण्याला ठेहराव देणारी, अगदी शांतपणे विचार करायला लावणारी आणि मुख्य म्हणजे चिमुकल्या मनांना जपायला शिकवणारी, तितक्याच सयंतपणे केलेली 'एकदा काय झालं' ही फिल्म आहे.
सलील कुलकर्णी
सुमीत राघवन, उर्मिला कानेटकर, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री
Ekda Kaay Zala Movie Review : एकदा काय झालं… हे मला तर जादूचं वाक्य वाटतं कारण त्यातून काय काय बाहेर येईल याची आपण कल्पनाच करू शकत नाही आणि गोष्टींचे तर आपण सारेच फॅन असतो. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणणारी म्हातारी, सोनेरी पंखांची परी, गुलबकावली किंवा मग चॉकलेटची नगरी हे गोष्टींचं विश्व आपलं बालपण समृद्ध करुन गेलं आहे. किंबहुना अजूनही करतंय. त्यातली पात्रं बदलली असली तरी आत्मा तोच आहे. त्याच गोष्टींच्या जगात पुन्हा एकदा आपल्याला नेऊन हसवत हसवत डोळ्यात पाणी देऊन जाणारी गोष्ट म्हणजे सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झालं’ (Ekda Kaay Zala) हा सिनेमा.
मुलांचं भावविश्व हळुवारपणे उलगडत, त्यांच्या जगाचा पदर अलवारपणे बाजूला करत त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा, त्यांना समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रवास या सिनेमाच्या माध्यमातून होतो.
बच्चेकंपनीकडे आपण आपलं 'मिनिएचर' म्हणून न पाहाता स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहिलं पाहिजे आणि तशाच पद्धतीने आपला त्यांच्याशी व्यवहार असला पाहिजे हे सलीलचंच माझा कट्ट्यावरचं वाक्य, या वाक्याचा नेमका अर्थ सलील या सिनेमातून मांडतो. केवळ तात्पर्याचा मारा न करता गोष्टीवर भर दिला तर त्यांच्या आयुष्याची गोष्ट सोपी होऊ शकते, त्यांच्या घडण्यात सहजता येऊ शकते. आणि मुळात त्यांनाही मन आहे, त्यांनाही विचार करण्यासाठी मेंदू आहे, त्यांनाही प्रश्न पडू शकतात, त्यांनाही कुतुहल वाटू शकतं, त्यांनाही मोठ्यांचं अनुकरण करावसं वाटू शकतं या साऱ्याचा पालक म्हणून आपण कसा स्वीकार करतो आणि त्याला कसा प्रतिसाद देतो त्यावर बरचसं अवलंबून असतं. तेच करण्याचा, सांगण्याचा हा प्रयत्न आहे.
सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा दुसराच सिनेमा पण हे सांगूनही पटणार नाही इतक्या उत्तम पद्धतीने त्याने या सिनेमाची बांधणी केली आहे. मुलांकडून काम करुन घेणं हे खरं तर खूप अवघड काम, पण सलीलने ते सफाईनं साधलं आहे. मुळात आपला सिनेमा काय संदेश देतोय याचा विचार न करता त्याच्या फंदातही न पडता आपल्याला छान गोष्ट सांगायची आहे यावर तो ठाम आहे. आणि तिथेच तो जिंकला आहे. दिग्दर्शक म्हणून त्याला काय सांगायचं आहे आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला काय स्वीकारायचं आहे या दोन्ही गोष्टी या कलाकृतीतून स्पष्ट होतात आणि हेच या सिनेमाचं यश आहे.
सुमीत राघवन आणि अर्जुन पुर्णपात्रे या सिनेमाचे खरे हिरो आहेत. त्यांच्यातल्या घट्ट केमिस्ट्रीवर या सिनेमाचा डोलारा उभा राहिला आहे. आणि त्याची पूर्ण जाणीव सलीलला असल्यानं त्यानं या दोघांवर तेवढी मेहनतही घेतली आहे. त्या दोघांचं नातं कित्येक पालक आदर्श म्हणून आपल्यासमोर ठेवू शकतात इतकं छान आहे. त्या दोघांइतकीच मला महत्त्वाची वाटते ती उर्मिला कोठारेने साकारलेली व्यक्तीरेखा. सिनेमाचा बॅलन्स सांभाळण्याचं काम ती करते. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर श्रोत्री आणि साऱ्याच बच्चेकंपनीची कामं कमाल झाली आहेत.
सिनेमाचं संगीत ही आणखी एक जमेची बाजू. प्रत्येक गाणं कथेला न्याय देणारं आणि पुढं नेणारं आहे. अर्थात राम आणि श्याम या गाण्याची पार्श्वभूमी तयार करण्यात थोडासा जास्त वेळ घेतल्यासारखं वाटतं. पण ते गाणंच इतकं भारी आहे की सगळं माफ.
थोडक्यात सलील कुलकर्णीने सांगितलेली ही गोष्ट आपण प्रत्येकाने पाहिलीच पाहिजे अशी आहे. आज जगण्याच्या नावाखाली आपण सारेच फक्त धावतो आहोत. त्या जगण्याला ठेहराव देणारी, अगदी शांतपणे विचार करायला लावणारी आणि मुख्य म्हणजे चिमुकल्या मनांना जपायला शिकवणारी, तितक्याच सयंतपणे केलेली ही फिल्म आहे. या सिनेमाला मी देतोय चार स्टार्स.