Crew Review : नायकांच्या जागी नायिका असलेला 'क्रू'
Crew Review : विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्रू मेंबर म्हटले जाते. या चित्रपटात विमानात काम करणाऱ्या तीन तरुणींची कथा सांगण्यात आली आहे म्हणून चित्रपटाचे नाव क्रू.
राजेश ए कृष्णन
कृती सेनन, करीना कपूर, तब्बू, दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा
Crew Review : दिग्दर्शकाने एकदा ठरवले की प्रेक्षक मंदबुद्धीचा असतो आणि त्याला तसेच मनोरंजन हवे, की तो लगेच त्याच पद्धतीने विचार करू लागतो आणि तसाच चित्रपट देण्याचा प्रयत्न करतो. त्याला वाटते की आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलोय. मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, डेव्हिड धवन, रोहित शेट्टी यांना प्रेक्षकांची नस सापडलेली होती आणि ते त्याचा पुरेपूर वापर चित्रपटात करीत. अर्थात कधी कधी तेसुद्धा वाहात गेलेले आहेत आणि त्यांचे चित्रपटही आपटले आहेत. या सगळ्यांची आज आठवण होण्याची कारण म्हणजे नवा चित्रपट क्रू (Crew).
'क्रू'मध्ये काय पाहाल? (Crew Movie Story)
विमानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्रू मेंबर म्हटले जाते. या चित्रपटात विमानात काम करणाऱ्या तीन तरुणींची कथा सांगण्यात आली आहे म्हणून चित्रपटाचे नाव क्रू. आता विमान म्हटल्यावर सोन्याचे स्मगलिंग आलेच. आणि सोने लुटणे आलेच. मग यासाठी अत्यंत बालिश पद्धतीने घटना तयार करून पडद्यावर मांडल्या म्हणजे चित्रपट तयार झाला असे वाटणाऱ्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट कोहिनूर विमान कंपनीत काम करणाऱ्या गीता सेठी (तब्बू), जस्मीन (करीना कपूर) आणि दिव्या (कृती सेनन) या तीन हवाईसुंदरींना अटक करण्यापासून होतो. कस्टम अधिकारी सोन्याच्या स्मगलिंगसाठी या तिघींना अटक करतात. त्यांच्या चौकशीतून चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो आणि सोन्याच्या स्मगलिंगची कथा मांडतो. या तिघी कोण असतात आणि त्या स्मगलिंगच्या या व्यवसायात कशा पडतात ते फ्लॅशबॅकमध्ये सांगितले जाते आणि मध्यंतर होते.
मध्यंतरानंतर या तिघी कोहिनूर विमान कंपनीच्या मालकाने विजय वालिया (शाश्वत चटर्जी) ने परदेशात नेलेले सोने भारतात परत कशा आणतात त्याची कथा मांडली आहे. जी अत्यंत बालिश आहे. जगातील सगळ्यात महागड्या हॉटोलमध्ये या सामान्य कुटुंबातील तरुणी प्रवेश करतात, त्यांना भारतातून एक तरुण अॅक्सेस कार्ड तयार करण्यास मदत करतो आणि मग विजय वालियाने नेलेले सोने त्या तिघी भारतात आणतात. त्या केवळ सोने भारतात आणून थांबत नाहीत तर स्वतःसाठीही बऱ्यापैकी पैसा जमा करतात अशी ही या क्रूची कथा आहे. किंगफिशर आणि विजय माल्याची आठवण हा चित्रपट करून देतो.
राजेश ए. कृष्णनने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यापूर्वी त्याने ओटीटीसाठी कुणाल खेमूला घेऊन लूटकेस नावाच चित्रपट तयार केला होता. राजेशकडे कौशल्य आहे पण पटकथा व्यवस्थित नसल्याने त्याचे काम वाया जाते. त्याच्या दिग्दर्शनात काही वेगळे किंवा त्याने काही नवे केले आहे असे नाही. त्याला निर्माते चांगले मिळाल्याने तब्बू (Tabu), करीना (Kareena Kapoor) आणि कृती सेननसारख्या (Kriti Sanon) नायिका त्याला मिळाल्या, पण त्यांचा तो पुरेपूर उपयोग करून घेऊ शकलेला नाही हे खेदाने म्हणावे वाटते. संपूर्ण चित्रपटभर सुभाष घईच्या ‘खलनायक’मधील ‘चोली के पीछे’ची धून ऐकवण्यात आलेली आहे आणि शेवटच्या टप्प्यात रिमिक्समध्ये ते गाणेही येते. पण या गाण्याचे प्रयोजनच समजले नाही. एकूणच राजेशच्या दिग्दर्शनाचा काहीही प्रभाव जाणवला नाही. ‘सोना कितना सोना है’ हे ‘हीरो नंबर वन’मधील गाणे चित्रपटातील सोन्याच्या स्मगलिंगला सूट करणारे असल्याने ठेवण्यात आले आहे. पण ओरिजनल बघायला, ऐकायला मिळत असेल तर रिमिक्सच्या मागे कोण जाईल?
मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरलेला 'क्रू'
तब्बूने वयस्कर हवाईसुंदरी गीता सेठीची भूमिका अन्य दोघींच्या तुलनेत चांगली साकारली आहे. तिच्या पतिच्या अरुणच्या भूमिकेत कपिल शर्माला छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. करीना कपूर आणि कृतीने त्यांच्या वाट्याला आलेले काम ठीक ठाक केले आहे. त्यात विशेष उल्लेखनीय असे काही नाही. कृती सेननला हीरो हवा आहे म्हणून दिलजीत दोसांझला घेतले आहे. त्याचीही छोटी भूमिका आहे. चित्रपटाच्या शेवटी दिलजीत दोसांझबरोबर बादशाह सुद्धा एक गाणे गाताना दिसतो.
एकूणच हा 'क्रू' मनोरंजन करण्यात अयशस्वी ठरला आहे.