Animal Movie Review : अंगावर शहारे आणणारा रणबीरचा 'अॅनिमल'!
Animal Review : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' हा बहुचर्चित सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
संदीप रेड्डी वांगा
रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, शक्ति कपूर, बॉबी देओल, सुरेश ओबेरॉय
Animal Review : 'अॅनिमल'चा (Animal) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाल्यापासून या सिनेमात रणबीर भाई (Ranbir Kapoor) काय धमाका करणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली होती. 'अॅनिमल' हा हिंसक सिनेमा असल्याचं दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. ट्रेलरमधील बॉबी देओलच्या (Bobby Deol) शेवटच्या सीनमधील अॅक्शन मोडने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली होती. पण या सिनेमातील त्याच्या भूमिकेत काहीही दम नाही. 'अॅनिमल' सिनेमा पाहण्याआधी हा रिव्ह्यू नक्की वाचा...
'अॅनिमल'चं कथानक काय? (Animal Movie Story)
वडिलांवर प्रेम करणाऱ्या एकाची मुलाची गोष्ट 'अॅनिमल' या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमात अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. मुलाचं वडिलांवर खूप प्रेम असलं तरी वडील मात्र मुलावर प्रेम करत नाहीत. दरम्यान रणबीरच्या वडिलांवर हल्ला होतो आणि खऱ्या अर्थाने सिनेमात ट्विस्ट येतो. हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा रणबीर शोध घ्यायला लागतो. 'अॅनिमल' या सिनेमाची गोष्ट साधी सरळ आहे. पण यातील ट्विस्ट तुमचं चांगलच मनोरंजन करतील.
'अॅनिमल' कसा आहे?
'अॅनिमल' हा मसालापट आहे. शिट्ट्या आणि टाळ्या येतील असे अनेक सीन्स या सिनेमात आहेत. 'अॅनिमल' या सिनेमाची सुरुवात थोडी संथ आहे. पण नंतर या सिनेमाला गती येते. दुसऱ्या भागात एकापेक्षा एक सीन आहेत. या सीनमध्ये काही लॉजिक नाही, असं तुम्हाला वाटू शकतं. हा सिनेमा पाहताना नक्कीच तुम्हाला मजा येईल.
'अॅनिमल'मध्ये अनेक अॅक्शन सीन दाखवण्यात आले आहेत. एखाद्या ठिकाणी अॅक्शनचा वापर करायला नको होता, असंही तुम्हाला वाटू शकतं. बॉबी देओलच्या नावावर या सिनेमाला प्रमोट करण्यात आलं आहे. पण खरंतर या सिनेमासोबत तो जास्त जोडलेला नाही. कुटुंबावर भाष्य करणारा हा सिनेमा असल्याने प्रेक्षकांना भावनिक करतो. सिनेमात महिलांबद्दल केलेल्या भाष्यामुळे यावर टीकाही होऊ शकते.
रणबीरच्या अभिनयाची कमाल
रणबीर कपूर सिनेमात 'बाप बाप' करत असला तरी सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की रणबीर आता अभिनयाच्या बाबतीत बॉलिवूडला नवा बाप झाला आहे. रणबीरने कमाल काम केलं आहे. अॅक्शन असो वा भावनिक सीन सिनेमातील प्रत्येक फ्रेममध्ये रणबीर लक्ष वेधून घेतो. रणबीरच्या करिअरमधला हा गेम चेंजर सिनेमा ठरू शकतो. रोमँटिक हिरो म्हणून असलेली इमेज त्याने ब्रेक केली आहे. बॉबी देओलची छोटी भूमिका असली तरी त्याने आपली भूमिका चोख निभावली आहे. रश्मिका मंदानानादेखील (Rashmika Mandanna) आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर (Anil Kapoor) जबरदस्त आहे. एकंदरीतच सिनेमातील सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.
संदीप रेड्डी वांगा यांनी 'अॅनिमल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 3 तास 21 मिनिट प्रेक्षकांना होल्ड करणं कठीण आहे पण संदीपने ते उत्तम जमवलं आहे. सिनेमातीचं संगीतदेखील चांगलं झालं आहे. एकंदरीतच 'अॅनिमल' हा सिनेमा तुमचं चांगलच मनोरंजन करेल.