Dithee Movie Review : शब्दांपलिकडची दिठी!
दिठी हा एक अनुभव आहे. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार तो घ्यायचा. सिनेमातल्या रामजीजवळ जो जेवढा जाईल.. त्याला तितक्या गहिऱ्या अवकाशात रामजी नेऊन सोडेल. सिनेमा जरूर पहा. सिनेमा संपतो आणि वाटत राहातं, सुमित्रा भावे असायला हव्या होत्या.
![Marathi Cinema Dithee sumitra bhave Movie Review by Soumitra Pote Dithee Movie Review : शब्दांपलिकडची दिठी!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/24/b8e8a21196f55a743a35d52186a7227c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुमित्रा भावे
किशोर कदम, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील, कैलास वाघमारे
ऐन पावसात, गावातल्या एका आडोश्याला तीन माणसं बसलेली असतात.
पहिला म्हणतो, रामजी आपल्या किती जवळचा. त्याच्या दु:खानं असं आत कळवळतंय. तरी वाटतंय.. आपल्यावर तरी असं काही बेतलं नाही ना. आतलं मन आपलं सगळं ठीक आहे म्हणतंय. आतलं काही हालतं की नाही.. काय जाणो.
दुसरा म्हणतो, एखादा माणूस दुसऱ्यासाठी.. संपूर्ण.. म्हणजे पूर्णपणेदु:खी नसतोच कधी बुवा.
...
अचानक अंगावर कोसळलेल्या दु:खदायक गोष्टी शब्दांच्या पलिकडल्या असतात.
ज्या सांगता येत नाहीत. ज्या समजावता येत नाहीत. ज्याचं अनुभवाचं अवकाश जेवढं गहिरं.. तेवढ्या त्याला या शब्दांपलिकडच्या गोष्टी समजून घेणं सोपं होतं.
फार कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते ही. समजून घेण्याची.
अनेकांना वाटतं, वयापरत्वे अनुभवाचं अवकाश विस्तारलं की माणसाच्या मनातल्या मौनात रुतून बसलेला शब्दांपलिकडचा अर्थ समजून घेता येईल. पण मौनातला अर्थ जाणून घ्यायला डोळे वाचता यावे लागतात.. उच्छ्वास समजून घ्यावे लागतात.. आणि समोर असलेल्या माणसाच्या विमनस्क चेहऱ्यामागे उसळणारा कल्लोळ आपआपल्या अनुभवाच्या खोल अवकाशाला साक्षी ठेवून समजून घ्यावा लागतो. ज्याचं ते अवकाश जेवढं गहिरं तेवढा त्याला मौनातला अर्थ जास्त उमगेल हे निश्चित.
सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी पाहिल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या गहिऱ्या अवकाशाचा थांग लागण्याची शक्यता निर्माण होते. या चित्रपटाचा नायक आपला हात धरून आपल्याच मनातल्या खोल मौनाकडे घेऊन जाऊ लागतो आपल्याला.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट. दि.बा.मोकाशींच्या कथेवर बेतलेला. भावेंनी यापूर्वी केलेले चित्रपटही मी पाहिले आहेत. जवळपास सर्वच. पण हा चित्रपट वेगळा आहे. या चित्रपटाची ठेवण.. या चित्रपटाचं टेक्श्चर.. याचा वेग.. यातल्या व्यक्तिरेखा.. असं सगळंच. खरं सांगायचं तर या चित्रपटात मुख्य भूमिका खरंतर चार. एक रामजी.. दुसरा सतत पडणारा पाऊस.. तिसरी भरून अंगावर येणारी नदी.. आणि चौथा विठ्ठल. इतर व्यक्तीरेखा हा प्रवास आपल्यासाठी सोपा करतात. अर्थात तेही तितकंच महत्वाचं. दिग्दर्शिकेचा हा चित्रपट आपलं बोट धरून आपल्याला आपल्याच अवकाशात नेऊन सोडतो.. इन्फिनिटीच्या दिशेने.. विठ्ठलाच्या साक्षीने.
रामजी विठ्ठलाचा भक्त. गेली 30 वर्षं रामजी वारी करतात. आता त्यांचा मुलगाही पुरता हाताशी आला आहे. घरी बाळंत सून आहे. अभंग, अध्याय मुखोद्गत असणारे रामजी जगण्याकडे अत्यंत सकारात्मकदृष्टीने पाहताहेत. अशातच एक अभद्र घटना रामजीच्या कुटुंबात घडते आणि रामजीची रोजच्या जगण्याची गती थांबते. ध्यानीमनी नसताना अचानक थांबलेल्या या गतीने रामजी पुरता थिजला आहे. या थिजलेल्या चक्राला पुन्हा गतीशील करणारी ही दिठी (दृष्टी) आहे.
ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार या दृष्टीचा अर्थ लावायचा आहे. पण म्हणून हा चित्रपट समजायला अवघड नाही. खरंतर अगदीच सहज आहे यातलं वाटणं. फक्त या चित्रपटाच्या गतीशी स्वत:ला जुळवून घेता आलं पाहिजे.. आणि रामजीला.. त्यातल्या त्याच्या प्रत्येक मनोवस्थेला शरण जाता आलं तर अधिक उत्तम. अत्यंत कमी परंतु नेमके संवाद हे या चित्रपटाचं बलस्थान. माणूस परिपूर्ण दु:खी नसतोच कधी हा यातला संवाद असो किंवा पोथी नव्हती तेव्हा उत्तरं कशी मिळत होती.. यात उत्तरं होतीच. ती असतातच... हा संवाद. किंवा, गायीसोबतचे रामजीचे प्रसंग.. त्यातले संवाद.. अगदीच समजायला सोपे पण त्या विशिष्ट परिस्थितीत आल्यामुळे अर्थ सोपे असले तरी त्या संवादांना कमालीचं गर्भित सूचन होतं.
चित्रपटात वापरलेल्या छायांकनाचं विशेष कौतुक. या चित्रपटातली प्रत्येक फ्रेम आणि आवश्यक तिथे केलेली प्रकाशयोजना निव्वळ अफलातून आहे. कलादिग्दर्शनही तितकंच सुरेख. विशेष कौतुक पोथी वाचनासाठी निवडलेल्या जागेचं. चित्रपटासाठी वापरलेलं संगीत, पार्श्वसंगीत.. त्याचं संकलन तितकंच उत्तम... प्रत्येक गोष्ट निवडून ती अस्सल कशी होईल हे पाहिलं गेलं आहे. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शशांक शेंडे, अमृता सुभाष, अंजली पाटील, कैलास वाघमारे आदी सगळीच मंडळी संवादासह लक्षात राहाणं हेच त्यांच्या चित्रपटात असण्याचं यश आहे. ज्यानं त्यानं आपल्या भूमिकेची गरज ओळखून त्यात रंग भरले आहेत.
.. आणि सरते शेवटी रामजी अर्थात किशोर कदम. कलाकार गाजला की गाजतो खूप. पण आपण घेतलेल्या अनुभवातून आलेलं सगळं संचित अभिनयात उतरवण्यासाठी त्याला तशा भूमिकेची वाट पाहावी लागते. किशोर कदम यांनी तब्बल 10 वर्षं ती वाट पाहिलीय. सुमित्रा भावेंनी शब्द दिल्याप्रमाणे तब्बल आठ वर्षांनी रामजी साकारण्याची संधी कदम यांना दिली आणि त्यांनी या भूमिकेला अनंतात नेऊन ठेवलं आहे. फारशी हालचाल नाही. फर्राटेदार संवाद नाहीत. प्रश्नार्थक भावनांचं ओझं घेऊन वावरणारं मौन सौबत घेऊन कदम यांनी रामजी उभा केला आहे.
दिठी हा एक अनुभव आहे. ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार तो घ्यायचा. सिनेमातल्या रामजीजवळ जो जेवढा जाईल.. त्याला तितक्या गहिऱ्या अवकाशात रामजी नेऊन सोडेल. सिनेमा जरूर पहा. सिनेमा संपतो आणि वाटत राहातं, सुमित्रा भावे असायला हव्या होत्या. कारण इथून पुढचे त्यांचे चित्रपट खूप वेगळ्या बांधणीचे झाले असते कदाचित. विषयाचं बोट धरून त्याला सिनेमात आणून तो अलगद अवकाशात सोडण्याचं कसब तर त्यांना गवसलं होतंच. असो.
पिक्चर-बिक्चरमध्ये सिनेमाला चार स्टार.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)