Tiger Nageswara Rao: खऱ्या नायकाच्या जीवनावर आधारित काल्पनिक ‘टायगर नागेश्वर राव’
Tiger Nageswara Rao: अॅक्शन चित्रपटाची आवड असेल तर हा चित्रपट तुम्ही पाहू शकता.
वम्सी
रवी तेजा, नुपूर सेनन, गायत्री भारद्वाज, अनुपम खेर, मुरली शर्मा, नसीर, हरीश पेराडी
Tiger Nageswara Rao: रॉबिन हूड ही संकल्पना फार जुनी आहे. श्रीमंताना लुटून गरीबांना मदत करणारे रॉबिन हूड वेगवेगळ्या काळात संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी होऊन गेले आहेत. आंध्र प्रदेशमध्येही 1970 च्या दशकात नागेश्वर राव नावाचा एक चोर होऊन गेला. तो पोलीस एन्काउंटरमध्ये मारला गेला. मात्र नागेश्वर राव श्रीमंतांना लुटून गरीबांना मदत करीत असे, असे म्हटले जाते, याचे कोणतेही पुरावे नाहीत, मात्र सांगोवांगीच्या कथा अनेक आहेत. आणि याच सांगोवांगीच्या कथांवर आधारित टायगर नागेश्वर राव चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा असा संदेश दिलेला आहे. या चित्रपटात एका मुलाच्या तोंडी हे उद्गार आहेत. त्यावरून हा चित्रपट कसा असेल याची कल्पना येते. गरीबांना उद्धार करून घ्यायचा असेल तर शिकणे आवश्यक आहे. दक्षिणेतील चित्रपटांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार नेहमी दाखवले जातात.
पंतप्रधानांच्या घरात चोरी करणार असल्याचे नागेश्वर राव घोषित करतो येथून चित्रपटाची सुरुवात होते. नागेश्वर रावला पंतप्रधानांच्या घरात चोरी करण्यापासून रोखण्यासाठी मोहीम आखली जाते. यासाठी आयबी प्रमुख रघुवेंद्र राजपूत (अनुपम खेर) विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतात. या बैठकीला आंध्रमधून एका पोलीस ऑफिसरला विश्वनाथ शास्त्री (मुरली शर्मा)ला बोलावले जाते. मुरली नागेश्वर रावची कथा सांगतो आणि चित्रपट फ्लॅशबॅकमध्ये जातो. मात्र या पोलीस ऑफिसरने सांगितलेली कथा खोटी असल्याचे मध्यंतरानंतर समोर येते. गरीब नागेश्वर आपल्या पित्यासमवेत स्टुअर्टपुरममध्ये राहात असतो. चोरी करणे हा त्यांचा पेशा असतो. चोरी करण्याचे कंत्राट गावातला पुढारी घेत असतो आणि पोलिसांना त्याबदल्यात लाच देण्यात येत असते. त्यामुळे पोलीस चोरांना पकडत नाहीत. मात्र दाखवण्यासाठी कधी कधी कोणालाही चोर म्हणून अटक करीत असतात.
नागेश्वर राव चोर बनतो पण तो लोकांच्या भल्यासाठी. गरीब, शोषितांचे भले व्हावे यासाठी तो सगळ्यांशी लढत असतो. या कामी त्याला त्याचे काही मित्र मदतही करीत असतात. नागेश्वर राव पंतप्रधानांच्या कार्यालयात चोरी करण्यात यशस्वी होतो. मात्र त्याच्या या चोरीमुळे पंतप्रधानांना त्याच्या चोरीमागच्या कारणांची माहिती होते आणि त्या त्याला माफ करतात.
रवी तेजा हा दक्षिणेत मास महाराजा म्हणून ओळखला जातो. कॉमेडी आणि अॅक्शन करण्यात तो तरबेज आहे. त्याचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला गोळा करण्यात यशस्वी ठरलेले आहेत. टायगर नागेश्वर राव चित्रपटात रवी तेजाने प्रथमच फक्त अॅक्शन आणि गंभीर भूमिका केली आहे. या भूमिकेत त्याने जान ओतली आहे त्यामुळे तो नागेश्वर रावच असावा असे वाटत राहते. संपूर्ण चित्रपट रवी तेजाच्या उत्साह आणि अभिनयामुळे पाहावासा वाटतो. चित्रपटाची लांबी आणखी थोडी कमी केली तर चित्रपट आणखी आकर्षक झाला असता.
चित्रपटातील अॅक्शन दृश्ये कमालीची आणि अंगावर येणारी आहेत. ही अॅक्शन दृश्ये चित्रपटाचा गाभा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कृती सेननची बहीण नुपूर सेननने या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर आगमन केले आहे. पहिला चित्रपट असतानाही नुपूरने चांगले आणि आत्मविश्वासाने काम केले आहे. गायत्री भारद्वाजने नागेश्वर रावच्या पत्नीची भूमिका चांगल्या प्रकारे साकारली आहे. हरीश मेलांडी यांनी खलनायकाच्या आमदार येलमांडाच्या भूमिकेत प्रभाव टाकला आहे.
दिग्दर्शक वम्सीने नागेश्वर राव यांचे चरित्र पडद्यावर चांगल्या प्रकारे उतरवले आहे. चित्रपट जराही कंटाळवाणा होणार नाही याची पुरेपूर काळजी वम्सीने घेतलेली आहे. मात्र काही ठिकाणी चित्रपट कंटाळवाणा होतो हेही खरे आहे. पण एकूणच वम्सीने चांगले काम केले आहे. रवी तेजा नागेश्वर राव वाटेल याची पूर्ण काळजी वम्सीने घेतली असून रवी तेजानेही त्याला चांगली साथ दिली आहे. रवी तेजा आणि अॅक्शनची आवड असेल तर हा चित्रपट पाहू शकता.