Stress Obesity : खूप ताण घेताय अन् वजनही वाढतंय, वाढत्या वजनाची धक्कादायक कारणं समोर
Reason's Of Obesity : लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत परंतु असंतुलित आहार हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते.
World Menthal Health Day 2023 : सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्याला आपल्या तब्येतीकडे लक्ष देता येत नाही. यामुळेच असंतुलित आहार आणि वाढता मानसिक ताण (World Menthal Health Day 2023) यामुळे अनेकजण लठ्ठपणाचे शिकार होत चालले आहेत. खरंतर, लठ्ठपणाची अनेक कारणे आहेत परंतु असंतुलित आहार हे त्याचे प्रमुख कारण मानले जाते. पण जर आजच्या धावपळीच्या काळात बोलायचे झाले तर लठ्ठपणा फक्त जास्त खाल्ल्यानेच वाढत नाही तर तणाव आणि इतर गोष्टींमुळेही तो वाढतो. शरीरावर अतिरिक्त वजन वाढण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात ते जाणून घेऊयात.
लठ्ठपणा अनुवांशिक असू शकतो
लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे कौटुंबिक इतिहास म्हणजेच अनुवांशिक कारणे असे सांगितले जाते. पालकांकडून मिळालेल्या जनुकांमुळे काही लोक कमी खाऊनही लठ्ठ होतात. कुटुंबात जास्त वजन असण्याचा इतिहास असेल तर येणाऱ्या पिढीतील मुलांनाही जास्त वजनाचा त्रास होतो.
ताण हे वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे
तणाव, चिंता या सर्व गोष्टी मेंदूशी निगडीत आहेत पण त्यांचा लठ्ठपणाशी खूप खोलवर संबंध आहे. यापूर्वीच्या अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, ज्या लोकांना तणाव आहे ते लोक लवकरच लठ्ठपणाचे बळी ठरतात. जेव्हा तणाव संप्रेरक कोर्टिसोल शरीरात सक्रिय असतो, तेव्हा ती व्यक्ती स्वतःला जास्त खाण्यापासून रोखू शकत नाही. या हार्मोनमुळे झोपेवरही परिणाम होतो आणि आहाराचाही अतिरेक होतो आणि अशा स्थितीत वजन वाढणे स्वाभाविक आहे.
व्यायामाचा अभाव
आजच्या काळात शरीराला फीट ठेवणं फार गरजेचं झालं आहे. याचं कारण म्हणजे वाढतं प्रदूषण, कामाचा वाढता ताण यामुळे अनेकदा मानसिक संतुलन ठीक राहत नाही. अशा वेळी अनेकांना व्यायामासाठी देखील पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळेही अनेक लोक लठ्ठपणाचे बळी ठरत आहेत. यासाठी दररोज किमान 30 मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामाअभावी वजन तर वाढतेच पण शुगर, हार्ट आणि बीपी संबंधित आजारांना आमंत्रण मिळते.
औषधांच्या दुष्परिणामांमुळे वजन वाढते
केवळ आजारच नाही तर काही वेळा आजारामुळे घेतलेल्या औषधांमुळेही वजन वाढते. अनेक आजारांवर दिली जाणारी अँटीडिप्रेसंट-स्टेरॉईड औषधे वजन वाढण्याचे कारण बनतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
World Mental Health Day : मनमुराद प्रवास करा; तणाव तर घालवाच मात्र प्रवासाचे फायदेही जाणून घ्या