(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Women Safety: महिलांनो..नवरात्रीत दांडीया-गरब्याला जाताय? तुमच्या फोनमध्ये 'हे' सुरक्षा 5 ॲप्स जरूर ठेवा, संकटसमयी येतील कामाला
Women Safety : महिलांनो.. तुम्हालाही घराबाहेर पडल्यानंतर एकटेपणा आणि असुरक्षित वाटत असेल, तर सुरक्षिततेसाठी तुमच्या फोनमध्ये काही ॲप्स ठेवू शकता. जाणून घ्या अशाच काही ॲप्सबद्दल..
Women Safety : कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाने पुन्हा एकदा देशाला लाजवेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. एवढेच नाही तर प्रत्येक राज्यात कोणत्या ना कोणत्या भागातून अशी प्रकरणं सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे अनेक महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घराच्या उंबरठय़ातून बाहेर पडताच महिलांच्या मनात पहिली शंका त्यांच्या सुरक्षेची आहे. सध्या नवरात्रीचा सण येत असल्याने ठिकठिकाणी दांडिया-गरबा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अशावेळी महिलावर्गही मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी रात्री घराबाहेर पडतात. परंतु कधी कधी अशी वेळ येते, जेव्हा महिलांना असुरक्षित वाटू शकते, त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला अशा काही सेफ्टी अॅप्सबद्दल सांगणार आहोत. जी तुमच्या फोनमध्ये जरूर असायला हवीत. जाणून घ्या..
महिलांनो.. तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही ॲप्स ठेवू शकता
आजकाल महिलांना काही कामासाठी, अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी एकटेच घर सोडावे लागते.. मात्र मागील काही दिवसात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. अनेकदा महिलांना एकटे पाहून त्यांना क्रूरतेचे बळी बनवले जाते. त्यामुळे स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि एकटेपणा जाणवू नये म्हणून, तुम्ही तुमच्या फोनमध्ये काही ॲप्स ठेवू शकता, जे तुम्हाला अडचणीपासून वाचवण्याचे काम करतील. आज आम्ही तुम्हाला त्या ॲप्सबद्दल सांगणार आहोत.
112 इंडिया ॲप
महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नाने महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया उपक्रमांतर्गत एक ॲप विकसित करण्यात आले. त्याचे नाव आहे- 112 इंडिया ॲप. हे ऍप्लिकेशन कोणीही डाउनलोड करू शकते. याचा फायदा असा होईल की, फक्त एक बटण दाबून किंवा पॉवर बटण तीन वेळा दाबून, कोणत्याही राज्य आपत्कालीन यंत्रणेला कॉल करता येईल. हे महिला सुरक्षा ॲप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांमध्ये वापरता येईल. या महिला सुरक्षा ॲपचा वापर एका क्लिकवर कोणत्याही परिस्थितीत SOS चेतावणी पाठवण्यासाठी केला जाऊ शकतो.
SafetyPin ॲप
SafetyPin ॲप हे महिलांसाठी एक सुरक्षा ॲप आहे, जे वापरकर्त्याची वैयक्तिक सुरक्षा सुनिश्चित करते. या ॲप्लिकेशनमध्ये जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, सुरक्षित ठिकाणी अचूक दिशानिर्देश यांसारखी वैशिष्ट्ये आहेत, ज्यामुळे ते इतर ॲप्सपेक्षा चांगले बनते. याव्यतिरिक्त, हे ॲप वापरकर्त्यांना असुरक्षित स्थाने पिन करण्याचा पर्याय देखील देते. हे ॲप हिंदी आणि इंग्रजीसह इतर अनेक भाषांमध्येही उपलब्ध आहे.
bSafe: Never Walk Alone ॲप
हे वैयक्तिक सुरक्षा ॲप आहे, जे सामाजिक सुरक्षा नेटवर्क तयार करते. या मदतीने, कोणताही वापरकर्ता असुरक्षित वाटत असल्यास नेटवर्कच्या इतर सदस्यांसोबत सूचना शेअर करू शकतो. या ॲपमध्ये असलेले bSafe अलार्म वैशिष्ट्य ते वेगळे करते. हा अलार्म निवडलेल्या आपत्कालीन संपर्कासह वापरकर्त्याचे अचूक स्थान सामायिक करतो. हे ॲप टायमर सुरू करते आणि संपर्कांपैकी एकाला ते बंद करण्यासाठी योग्य वेळी येईपर्यंत अलार्म पाठवत राहते.
Raksha ॲप
Raksha ॲपच्या मदतीने, संकटाच्या वेळी, एक महिला एका बटणाद्वारे तिच्या कुटुंबाला तिच्या वर्तमान स्थानासह अलर्ट पाठवू शकते. यामध्ये वापरकर्ते ते संपर्क निवडू शकतात जे लोकेशन पाहू शकतात. विशेष बाब म्हणजे हे ॲप बंद किंवा नॉन-ऑपरेटिव्ह मोडमध्ये असले तरीही काम करते. त्याच्या मदतीने महिला त्यांच्या आवडत्या कॉन्टॅक्ट्सला फक्त तीन सेकंदांसाठी आवाज बटण दाबून अलर्ट करू शकतात. याव्यतिरिक्त, रक्षा ॲपमध्ये SOS फंक्शन देखील प्रदान केले आहे, ज्याच्या मदतीने डेटा किंवा इंटरनेट नसल्यास एसएमएस अलर्ट शेअर केले जाऊ शकतात.
Smart 24x7 app (स्मार्ट २४x७)
हे ॲप महिला वापरकर्त्यांसाठी उत्कृष्ट वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. महिला सुरक्षेला वाहिलेल्या या ॲपला भारतातील विविध राज्यांच्या पोलीस विभागांचे समर्थन आहे. हे समस्या उद्भवल्यास आपत्कालीन संपर्कांना पॅनीक अलर्ट पाठवते. याव्यतिरिक्त, घाबरलेल्या परिस्थितीत, हे ॲप वापरकर्त्याला पोलिसांशी आवाज आणि फोटो सामायिक करण्याची सुविधा देखील प्रदान करते.
हेही वाचा>>>
Navratri 2024 Baby Names : तुमच्या लाडक्या लेकीला द्यायचंय देवीचं नाव? तर नवरात्रीचा आहे शुभ मुहूर्त! आधुनिक, अर्थपूर्ण नावं जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )