एक्स्प्लोर
Vat Purnima 2020 | आज वटपौर्णिमा, कोरोनाच्या सावटाखाली स्त्रिया करणार पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत
ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. यंदा मात्र या सणावर देखील इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळं स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपणे गरजेचे आहे
मुंबई :हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे वट पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. यंदा मात्र या सणावर देखील इतर सणांप्रमाणे कोरोनाचे सावट आहे. त्यामुळं स्त्रियांनी सुरक्षित राहून आणि नियमांचे पालन करुन ही परंपरा जपणे गरजेचे आहे.
निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. त्यात आज पर्यावरण दिन देखील असल्याने दुहेरी योग जुळून आला आहे.
वटसावित्रीचे धार्मिक व्रत
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान-सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा- नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्यात. मग त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. त्यानंतर पाच अर्घ्ये द्यावीत. मग सवित्राची प्रार्थना करावी. पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सावित्रीची कथा ऐकावी. या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली तरी रूढी मात्र वेगळी आहे.
वडाच्या झाडाचं महत्व
सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाचं झाड गर्द सावली देखील देतं. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे', अशी प्रार्थना करतात. वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा ही पूजेचा एक हेतू आहे.
काय आहे नेमकी सत्यवान-सावित्रीची कथा
अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.
सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.
माहितीस्त्रोत- विकीपीडिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement