Travel: जिथे होतं शिवाच्या 8 रूपांचं दर्शन! जगातील एकमेव अद्भूत शिवलिंग, जाणून घ्या मंदिराची खासियत
Travel: तुम्हाला माहितीय का? भारतात एक असे मंदिर आहे, जिथे तुम्ही एकाच वेळी शिवाची आठ रूपे पाहू शकता. हे शिवलिंग पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात.
Travel: हिंदू धर्मात भगवान शंकराला सृष्टीचा रक्षणकर्ता मानले जाते. भगवान शिवाचे जगभरात अनेक भक्त आहेत. याच भगवान शंकराची अनेक रुपं आहेत. अगदी शिवाच्या उग्र रूपापासून साध्या आणि शांत रूपापर्यंत अनेक रुपे आहेत, परंतु कोणत्याही एका मंदिरात शिवाची इतकी एकत्र रूपं पाहायला मिळत नाही. तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल, परंतु भारतच काय अवघ्या जगभरात एक असे शिवलिंग आहे. जिथे शिवाच्या 8 रूपांचं दर्शन होते. हे एक अद्भूत शिवलिंग मानले जाते, जाणून घ्या मंदिराची खासियत
शिवना नदीतच लपवून ठेवले होते अद्भूत शिवलिंग...!
आम्ही ज्या शिवलिंगाबद्दल सांगत आहोत, ते शिवलिंग मध्य प्रदेशातील मंदसौर मध्ये आहे. इथल्या मंदिरातील शिवलिंग संपूर्ण जगात दुसरे नाही. हे मंदिर शिवना नदीच्या घाटावर आहे, पण पावसाळ्यात मंदिरात पाणी शिरते. घाटावर असल्याने भाविकांनाही येथे स्नान करायला आवडते. असे मानले जाते की, जेव्हा भारतावर विविध ठिकाणाहून आक्रमणे होत होती, तेव्हा विदेशी सैन्याने देशातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या शिवलिंगाला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी शिवना नदीतच लपवून ठेवले. या मंदिरातील मूर्तीचे संपूर्ण जगात दुसरे रूप नाही, हे शिवलिंग शिवना नदीतून 1940 मध्ये बाहेर काढण्यात आले. यानंतर 1961 मध्ये मंदिराच्या गर्भगृहात मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावर मंदिराचे सध्याचे स्वरूप तयार झाले.
अष्टमुखी शिवलिंगाचे वैशिष्ट्य काय?
या शिवलिंगावरील आठ मुखं जीवनातील सर्व अवस्था दर्शवतात. सर्व प्रथम, शिवाचा चेहरा पूर्वेकडून सुरू होतो, दक्षिणेकडे येताच किशोरवयीन चेहरा दिसतो, त्यानंतर तरुणपणाचा टप्पा आणि शेवटी वृद्धत्वाचा चेहरा दिसतो. हे पाहून तुम्हालाही वाटेल की ही खूप अनोखी गोष्ट आहे. भगवान शंकराची ही मूर्ती जिवंत मानली जाते आणि म्हणूनच हे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. या मूर्तीमध्ये शिवाचे प्रत्येक रूप पाहता येते, ज्यामध्ये ते शर्व, भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव या रूपात दिसतात आणि हे लिंग देखील आठ तत्वांपासून बनविले आहे. याची खास गोष्ट अशी आहे की, या लिंगाकडे तुम्ही कोणत्याही बाजूने पाहाल तरी ती वेगळेपण दिसेल.
या शिवलिंगाचा इतिहास काय आहे?
हे शिवलिंग कधी निर्माण करण्यात आले, याबाबत कोणताही ठोस पुरावा नसला तरी काही रिपोर्टनुसार ती 575 मध्ये बांधली गेली होती. त्यावेळी राजा यशोधर्मन होता. या मूर्तीची मुख्य चार मुखे आधी तयार केली गेली आणि उर्वरित चार मुखे काही काळानंतर तयार झाली.
एक प्रसिद्ध लोककथाही
यासंबंधी एक प्रसिद्ध लोककथाही आहे. नदीत शिवलिंग लपविल्यानंतर ते अनेक वर्षे तसेच राहिल्याचे मानले जाते. यानंतर उदा नावाच्या एका धोबीला नदीच्या काठावर एक दगड सापडला ज्यावर त्याने कपडे धुण्यास सुरुवात केली. एका रात्री भगवान शिव त्यांच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले की हा दगड त्यांच्या 8 रूपांपैकी एक आहे. दुसऱ्याच दिवशी गावकऱ्यांसह धोबीने मूर्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र एवढी जड मूर्ती काढण्यासाठी संपूर्ण गावाची मदत लागली. त्यावेळी ही मूर्ती बाहेर आल्यावर ती प्रत्यक्षात शिवाचीच मूर्ती असल्याचे समोर आले. मूर्ती बाहेर आल्यावर ती नदीच्या काठावर बसवण्यात आली. ती दुसरीकडे न्यायची होती, पण त्यानंतर हे शिवलिंग तिथून हलले नाही. त्यामुळे याच ठिकाणी पशुपतीनाथाचे मंदिर बांधण्यात आले.
शिवलिंगाची खासियत
या शिवलिंगाचे वजन 4600 किलो असून ते दोन वेगवेगळ्या भागात बनवण्यात आले आहे.
या शिवलिंगाची तुलना नेपाळच्या पशुपतीनाथाशी केली जाते, म्हणून तिला पशुपतिनाथाचे रूप मानले जाते.
या शिवलिंगाचे गावातील गृहस्थ शिवदर्शन अग्रवाल यांच्या घरी काही वर्षे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. मंदिर बांधण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी ते आपल्या शेतात ठेवले.
पशुपतिनाथ मंदिराचे दरवाजे कधी उघडतात?
हे मंदिर सकाळी 6 वाजता उघडते आणि पहिली आरती सकाळी 7.30 वाजता होते. हे मंदिर रात्री साडेनऊ वाजता बंद होते.
हेही वाचा>>>
Winter Travel: पत्नी सोबतचे वाद मिटतील! फक्त लोणावळ्यातील ही 3 ठिकाणं एक्सप्लोर करा, नात्यात येईल गोडवा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )