Durga Ashtami :आज दुर्गाष्टमी... देवीच्या रुपात होणार कन्या पूजन, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Navratri 2021 : आज नवरात्रीमधील महत्वाचा दिवस. आज दुर्गाष्टमी (Durga Ashtami )आहे. या दिवशी मुलींचं पूजन केलं जातं.
Navratri 2021 : शारदीय नवरात्र 7 ऑक्टोबर गुरुवारपासून सुरु झाला असून हा उत्सव उद्या 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. आज नवरात्रीमधील महत्वाचा दिवस. आज दुर्गाष्टमी आहे. या दिवशी मुलींचं पूजन केलं जातं. उद्या महानवमी असेल आणि नवरात्रीचं विसर्जन देखील होणार आहे.
महाअष्टमी पूजेचे शुभ मुहूर्त
चौघडिया मुहूर्त सकाळी 6:26 ते 7:53 लाभ
सकाळी 7:53 ते 9:20 अमृत
सकाळी 10:46 ते12:13 शुभ
सायंकाळी 4:32 ते 5:59 लाभ
सायंकाळी 7:32 ते 9:06 शुभ
यंदा नवरात्री आठ दिवस
नवरात्रीमध्ये 9 दिवसांपर्यंत देवीच्या वेगवेगळ्या रुपांची पूजा केली जाते. असं म्हटलं जातंय की, या दिवसांत देवीचं व्रत आणि पूजा अर्चना केल्यानं देवी स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांचं दुःख हरण करते. नवरात्रीचे नऊ दिवस अत्यंत खास असतात. घरात, कुटुंबात आनंदाचं वातावरण असतं. शारदीय नवरात्र यंदाच्या वर्षी गुरुवारी सुरु होऊन उद्या गुरुवारीच समापन होणार आहे. एक तिथीचा लोप झाल्यानं यंदा नवरात्री आठ दिवस साजरा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीत गुरुचा विशेष योग जुळून येणार आहे. 7 ऑक्टोबर गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष एकमपासून सुरु होऊन दुर्गा महानवमी 14 ऑक्टोबरपर्यंत साजरी होणार आहे. तसेच 15 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे.
काय आहे गुरुचा विशेष योग?
तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, गुरु ज्ञान आणि बुद्धिचे दैवत असतात. त्यांना सर्व देवांचं गुरु मानलं जातं. यंदाच्या वर्षी गुरुवारी नवरात्री सुरु आणि समाप्त होणं शुभं मानलं जात आहे. असा योग अनेक वर्षांतून एकदा जुळून येतो. अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदा 6 ऑक्टोबर बुधवारी संध्याकाळी 4.34 वाजता सुरु होणार आहे. जी गुरुवारी दुपारी 1.46 वाजेपर्यंत असणार आहे. या दिवशी सकाळी घटस्थापना करण्यात आली. यंदाच्या वर्षी तृतीया तिथी आणि चतुर्थी शनिवारी एकाच दिवशी आली होती. ज्यामुळे चतुर्थीचा लोप झाला. म्हणून यंदा चंद्रघंटा आणि कुष्मांडा या देवीच्या रुपांची एकाच दिवशी पूजा केली गेली. याच कारणामुळं नवरात्रोत्सव आठ दिवस साजरा करण्यात येत आहे.
दुर्गा मातेची नऊ रूपांमध्ये पूजा केली जाते
1. पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
2. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.
3. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटाची पूजा केली जाते.
4. चौथ्या दिवशी कुष्मांडाची पूजा केली जाते.
5. पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.
6. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते.
7. सातव्या दिवशी कालरात्रीच्या रुपाची पूजा केली जाते.
8. आठवा दिवस महागौरीची पूजा केली जाते.
9. नववा दिवस आई भवानीची पूजा केली जाते.