Rose Day 2021: 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?
Valentine Week 2021: गुलाबाच्या रंगाप्रमाणे आपल्या मनातील भावनाही बदलत जातात... व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात या 'रोज डे' (Rose Day) ने होते. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपल्या मनातील भावना गुलाबाच्या रुपात व्यक्त करायचा हा दिवस आहे.
Rose Day 2021: फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे पासून होते तर शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ने होते. आजचा रविवार रोज डे अर्थात गुलाब दिवसाच्या स्वरुपात साजरा केला जातो.
व्हॅलेंटाईनची वीकची सुरुवात झाली असून तो जगभरातील तरुणांकडून उत्साहाने साजरा केला जातो. तसं पहायला गेलं तर व्हॅलेंटाईन वीक किंवा हे वेगवेगळे डे हे पाश्चात्य संस्कृतीचे लक्षण. सुरुवातीच्या काळात केवळ मोठ्या शहरात साजरे करण्यात येणारे हे डे आता गावागावतही साजरे केले जातात. महाविद्यालयातील तरुणांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
व्हॅलेन्टाईन वीकची सुरुवात आज रोज डे ने झाली आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. गुलाब हे प्रेमाचं प्रतिक समजलं जातं. आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतो. प्रेमात पडलेल्यांसाठी गुलाबाचं महत्व मोठं असतं, त्यांचं अवघं आयुष्यच गुलाबी होऊन जातं.
भारतात प्राचीन काळापासून, अगदी राजा-महाराजांपासून प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचा वापर करण्यात येतोय. आपल्या मनातील भावना शब्दात व्यक्त करता येत नसतील तरीही आपल्या आवडत्या व्यक्तीला केवळ गुलाब दिलं तरी भावना पोहचतात. यामध्ये लाल रंगाच्या गुलाबाचा वापर केला जातो. त्या व्यतिरिक्त इतर अनेक रंगाचे गुलाब अनेक भावना व्यक्त करण्यासाठी वापरतात. गुलाबाच्या रंगाप्रमाणे आपल्या मनातील भावनाही बदलतात.
लाल गुलाब; प्रेमाचं प्रतिक आपल्याकडे लाल गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. आपल्या मनातील प्रेम व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो. प्रेमी युगुलांच्या जीवनात लाल गुलाबाला मोठं महत्व असतं. त्यामुळे पहिल्यांदाच आपल्या प्रेमाची भावना व्यक्त करताना लाल गुलाबाचा वापर केला जातो.
पांढरे गुलाब; निस्वार्थी प्रेमाचं प्रतिक पांढरा रंग हा तसा शांततेचं प्रतिक समजले जाते. त्यामधून पवित्रता आणि शांतीची भावना व्यक्त होते. जर तुम्ही कोणावर शुद्ध आणि निस्वार्थी प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीला पांढरे गुलाब देऊ शकता. आपल्या नात्यातील प्रेम दर्शवण्यासाठी या गुलाबांचा वापर केला जातो. कोणत्याही नात्याची सुरुवात करताना या रंगाचे गुलाब देण्यात येतात. महत्वाचं म्हणजे नात्याची शेवट करतानाही याच रंगाचे गुलाब देण्यात येतात.
गुलाबी गुलाब; प्रेरणेचे प्रतिक गुलाबी रंग हा प्रेरणा अथवा प्रोत्साहनाचा रंग मानला जातो. तसेच आपल्याला कोणी आवडत असेल तर त्याची कबुली या गुलाबी गुलाबातून देता येते. आपण कोणाकडून प्रेरित झाला असाल किंवा कोणाला आपला आदर्श मानत असाल तर त्याच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबी रंगाचे गुलाब देऊ शकता.
केशरी गुलाब; त्यागाचं प्रतिक केशरी रंग त्यागाचे आणि वीरतेचे प्रतिक मानले जाते. जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल किंवा त्याच्या प्रती समर्पणाची भावना असेल तर त्या व्यक्तीला केशरी रंगाचे गुलाब देऊ शकता. या रंगाचे गुलाब दुर्मीळ आहे. तसंही या रंगाप्रमाणे खरे प्रेमही दुर्मीळ असल्याचं दिसतंय.
पिवळे गुलाब; मैत्रीचे प्रतिक पिवळा रंग मैत्रीचे लक्षण आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात कोणी ना कोणी खास मित्र असतात, ज्यांच्यासाठी आपण काहीही करु शकतो. जर तुमच्यातील मित्रत्वाचे संबंध समुद्राप्रमाणे अथांग असतील तर अशा व्यक्तीला तुम्ही पिवळे गुलाब देऊ शकता आणि आपल्या मैत्रिची भावना व्यक्त करु शकता.
आजच्या रोज डे च्या निमित्ताने कोणाला कोणत्या रंगाचे गुलाब द्यायचे हे तुम्ही ठरवा.
Valentine Week 2021: 'व्हॅलेंटाईन वीक'मध्ये 'त्या' खास व्यक्तीला सरप्राईज देण्यासाठी सज्ज आहात ना?