(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ganesh Chaturthi 2023 : जेव्हा शनिदेवाची वक्र दृष्टी गणपतीवर पडली, तेव्हा काय घडलं जाणून घ्या
Ganeshotsav 2023 : गणपती बाप्पाची पूजा केल्याने सर्व बाधा दूर होतात. गणपतीही एकेकाळी गंभीर संकटात सापडला होता. याचे कारण शनिदेव होते.
मुंबई : सर्वत्र गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2023) लगबग सुरू झाली आहे. गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) ला गणपती बाप्पाचं आगमन होऊन घरोघरी मनोभावे पूजा केली जात आहे. श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी आराधना आणी पूजाअर्चा केली जाते. अनंत चर्तुदशी दिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर 2023 रोजी पाहूणचार घेऊन बाप्पाचं विसर्जन करण्यात येईल. श्री गणेशाला विघ्नहर्ता मानलं जातं. गणपती बाप्पा सर्व अडथळे दूर करतो, पण भक्तांच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करणारा गणपती बाप्पाही एकेकाळी खूप मोठ्या संकटात सापडला होता. याचं कारण शनिदेव होते. गणपती आणि शनिदेवाची (Shani dev Katha) कहाणी जाणून घ्या.
गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होते आणि त्याची सांगता अनंत चतुर्दशी (Ananta Chaturdashi) च्या दिवशी गणपती बाप्पाच्या विसर्जनाने होते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाचा जन्म झाल्याचं शास्त्रात सांगितलं जातं. याच दिवसाला गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) असंही म्हणतात.
गणपती आणि शनिदेवाची कथा (Ganesh and Shani Dev Katha)
ब्रह्मवैवर्त पुराणातील (Brahmavaivarta Purana) कथेनुसार, भगवान शंकर आणि माता पार्वतीचा धाकटा पुत्र गणेशाचा जन्मोत्सव शिवलोकात थाटामाटात साजरा केला जात होता. गणपतीला आशीर्वाद देण्यासाठी सर्व देवी-देवता कैलास पर्वतावर पोहोचले होते. न्यायदेवता शनिदेवही या उत्सवात सहभागी झाले होते पण ते मान खाली घालून उभे होते. शनिदेवाने श्रीगणेशाकडे एकदाही पाहिलं नाही. यामुळे माता पार्वती आश्चर्यचकित झाली.
जेव्हा शनिदेवाची वक्री गणपतीवर पडली...
माता पार्वतीने शनिदेवांना मान खाली घालून उभं असण्याचं आणि बाल गणेशाकडे न पाहण्याचे कारण विचारलं. शनिदेवाने माता पार्वतीला सांगितलं की, गणेशाला शनिदेवाच्या वक्र दृष्टीमुळे दर्शनाने इजा होऊ शकते. माता पार्वतीच्या विनंतीवरून शनिदेवाला गणपतीकडे पाहण्यास भाग पाडलं. शनिदेवाची वक्री नजर श्री गणेशावर पडताच त्यांचं मस्तक धडापासून वेगळं होऊन आकाशात दूर उडून गेले. हे पाहून माता पार्वती बेशुद्ध झाली.
यानंतर भगवान विष्णू गरुडावर स्वार होऊन श्री गणेशाच्या मस्तकाच्या शोधात उत्तरेकडे निघाले. त्यानंतर ते हत्तीचे मस्तक घेऊन कैलासात परतले आणि नंतर हत्तीचे मस्तक गणपतीच्या धडाला जोडण्यात आलं. अशा प्रकारे श्रीगणेशाला पुन्हा जीवदान मिळालं.