(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023: बीडच्या पाटोदा तालुक्यात नाथांच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा संपन्न
Ashadhi Wari 2023: पैठण ते पंढरपूर दिंडीदरम्यान प्रवासात एकूण पाच 'रिंगण सोहळे' होणार आहे.
Ashadhi Wari 2023: पैठणहून निघालेली संत एकनाथ महाराजांची (Sant Eknath Maharaj) पालखी सध्या बीड जिल्ह्यात आहे. दरम्यान आवळवाडीचा कठीण घाट चढून पाटोदा तालुक्यात आगमन झालेल्या संत एकनाथांचा पालखी सोहळा शुक्रवारी पाटोद्याला मुक्कामी होता. तर शनिवारी तालुक्यातील पारगाव घुमरा येथे पालखीचा दुसरा रिंगण सोहळा संपन्न झाला असून, यावेळी हजारो वारकऱ्यांसह भक्तांची उपस्थिती पाहायला मिळाली. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यानंतर पालखी जामखेड तालुक्यातील दिघोळ साठी मुक्कामी रवाना झाली. दरम्यान पाटोदा तालुक्यातील गावागावात पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भाविकांनी वारकऱ्यांची मनोभावे सेवा देखील केल्याचे दिसून आले.
रघुनाथ बुवा गोसावी यांच्या नेतृत्वाखाली 10 जून रोजी पैठणहून निघालेला संत एकनाथांचा पालखी सोहळा सहाव्या मुक्कामी पाटोदा शहरात दाखल झाला. शिरूर कासार तालुक्यातील रायमोह मुक्कामी असलेला सोहळा 16 जून रोजी आवळवाडीचा कठीण घाट चढून गारमाथा येथे पोहचला. तर उंबरविहीरा तांबाराजुरी मार्गे पाटोदा शहरात दाखल होतो. दरम्यान पाटोदा तालुक्यातील पारगावी येथे दुसरा रिंगण सोहळा पार पडला.
नदीपात्रात सोहळ्याची परंपरा
पाटोदा मुक्कामानंतर पालखीसोहळा घुमरा पारगाव कडे प्रस्थान करतो. पारगाव येथे पालखीचा दुसरा रिंगण सोहळा असतो. या रिंगण सोहळ्यास पालखी परंपरेमध्ये विशेष महत्त्व आहे. पारगाव गावाशेजारील नदीपात्रात सोहळ्याची परंपरा आहे. मात्र मागील काही वर्षात नदीपात्र अरुंद झाल्याने सोहळ्यास अडचणी येत असत. सरपंच पद्माकर घुमरे व गावकऱ्यांनी गतवर्षापासून रिंगण सोहळ्यासाठी गावालगतच्या मैदानाची निवड केली. शनिवारी मोठ्या उत्साहात रिंगण सोहळा पार पडला.
वारकऱ्यांचे हाल
पैठणहून पंढरीसाठी जाणाऱ्या वारकरी भाविकांचा पायी प्रवास सुखकर व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्ता बांधकामाचा निर्णय घेतला. मागील सहा वर्षापासून हा रस्ता कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अर्धवट आहे. वारकऱ्यांचे या रस्त्यावरून पायी चालतानाचे हाल कायम आहेत. विशेष म्हणजे पंढरपूरला जाणाऱ्या पालख्यात संत एकनाथ महाराज यांच्या पालखीला तिसरे स्थान आहे. मात्र असे असताना दरवर्षी वारकऱ्यांना खडतर प्रवास करावा लागत आहे.
तिसरा रिंगण सोहळा नांगरडोहात..
पैठण ते पंढरपूर दिंडीदरम्यान प्रवासात एकूण पाच 'रिंगण सोहळे' होणार आहे. 13 जून रोजी मिडसावंगी येथे 'पहिले रिंगण' पार पडला होता. तर पारगाव घुमरे येथे 17 जूनला दुसरे 'रिंगण सोहळा' पार पडला. आहे. तर आता 20 जून रोजी नांगरडोह गावात तिसरे रिंगण होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: