(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Wari 2023: वारकरी भक्तांसाठी आनंदवार्ता! विठुरायाच्या दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी होणार, जिल्हाधिकाऱ्यांचा दावा
Ashadhi Wari 2023 : विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबत जात असतो.
Ashadhi Wari 2023 Pandharpur: यंदा प्रथमच दर्शन रांगेत प्रत्येक 50 मीटरवर दर्शन रांग वेगाने पुढे नेण्यासाठी निरीक्षक नेमण्याची योजना जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी आणल्याने आता यात्रा कालावधीत दर्शनाचा वेळ 7 ते 8 तासांनी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरु केला आहे. यामुळे यात्रा कालावधीत 30-30 तास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना यामुळे मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
विठुरायाची दर्शन रांग विठ्ठल मंदिरापासून जवळपास 7 ते 8 किलोमीटर लांब जात असते. यातच दर्शन रांगेत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात घुसखोरी होत असल्याने भाविकांच्या दर्शनाचा वेळ लांबत जात असतो. याचा फटका वृद्ध भाविक महिला आणि लहान मुलांना बसत असतो.
आता, यावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण दर्शन रांगेत दर 50 मीटरवर निरीक्षक नेमून त्यांना बिनतारी यंत्रणा दिली जाणार आहे. एखाद्या ठिकाणी काही गडबड दिसून आल्यास तातडीने तिथे सुरक्षा रक्षकांमधील एक टीम पोचून घुसखोरी रोखेल. या व्यवस्थेमुळे दर्शनाची रांग न थांबता वेगाने पुढे पुढे जात राहील आणि यामुळे दर्शन रांगेतील भाविकांचा जवळपास सात ते आठ तासांचा वेळ कमी केला जाणार आहे.
याशिवाय पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार मुख्यमंत्र्यांच्या शासकीय महापूजेनंतर कोणत्याच व्हीआयपीला दर्शन मिळणार नाही. त्यामुळे घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपी मंडळींना पूर्णपणे पायबंद बसणार आहे. याचा फायदाही दर्शनाचा वेळ कमी होण्यात होणार आहे. यंदा पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या यंत्रणा राबविली जाणार असून ज्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना वेगाने दर्शन घेता येणार असल्याचे जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी सांगितले आहे.
दरम्यान यंदा सोबर सांगोला रोडवरील बिडारी बंगला परिसर आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ दोन नवीन पालखी तळ बनविण्यात आले आहेत. या ठिकाणी जवळपास एक लाख भाविकांच्या विश्रांती आणि निवासाची व्यवस्था केल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. या दोन्ही पालखी तळावर देखील सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.
आजपासून देवाचे राजोपचार बंद; भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरू
आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या पदस्पर्श आणि मुख दर्शनाचा लाभ देण्यासाठी आजपासून देवाचे सर्व राजोपचार बंद करण्यात आले असून आता 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.
विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. आषाढी यात्रा संपेपर्यंत देव झोपायला जाणार नाहीत. देवाचा पलंग निघतो म्हणजेच देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूर मध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे.
तर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे चार वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजेपर्यंत चालते आणि त्यानंतर मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याच साठी दर्शन बंद राहणार आहेत. उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. आता आषाढी यात्राकाळात आजपासून मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे.