(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashadhi Ekadashi: विठुरायाच्या दर्शन रांगेत अभूतपूर्व गोंधळ; शासकीय महापूजेनंतरही दर्शन रांग वेगाने पुढे सरकत नसल्याने भाविक आक्रमक, मंदिर समिती मुर्दाबादची घोषणाबाजी
Pandharpur Ashadhi Wari: शासकीय महापुजेमुळे रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत फक्त मुखदर्शन सुरू होते. पायावरील दर्शन पाच तास बंद राहिल्याने 26 तासांचा वेळ लागत आहे.
पंढरपूर : पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन वारकरी पंढरपुरात (Pandharpur Ashadhi Wari) दाखल झाले आहेत. पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमली आहे. विठ्ठल दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. भाविकांची गर्दी सातत्याने वाढतच जात आहे. दर्शनासाठी तब्बल 24 ते 26 तास भाविकांना रांगेमध्ये उभे राहवे लागत आहे. त्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापूजा पहाटे संपल्यानंतरही दर्शन रांग अतिशयसंथपणे पुढे सरकत असल्याने उपस्थित भाविकांनी मोठा गोंधळ केला . पोलिसांच्या मदत केंद्राजवळ जाऊन पोलिसांनाच जाब विचारात मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणाबाजी करत भाविकांनी आपला संताप व्यक्त केला.
यंदा खरे तर मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेच्या वेळेत कपात करत पूजा सुरु असतानाही मुख दर्शनाची रांग पहिल्यांदाच सुरु ठेवल्याने जवळपास दीड ते दोन लाख भाविकांना मुखदर्शन घेता आले आहे. मंदिराच्या परंपरेनुसार एकादशीला म्हणजे आज पहाटे बारा वाजता मंदिर सफाईसाठी पदस्पर्श दर्शनासाठी बंद करण्यात आले होते . यानंतर मंदिर समितीची पाद्यपूजा आणि नित्यपूजा झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महापूजा दोन नंतर सुरु होऊन साडे तीन वाजता दोन्ही पूजा झाल्या होत्या . यानंतर मंदिर सत्काराच्या कार्यक्रमात देखील मुख्यमंत्र्यांनी मानाच्या वारकऱ्याच्या सत्कारानंतर कोणालाही भाषणाची संधी न देता थेट स्वतः भाषण करून कार्यक्रम वेळे आधी पूर्ण करत मंदिर सोडले . मात्र यानंतर मंदिराकडून दर्शनाचा वेग वाढणे अपेक्षित होते .
मुख्यमंत्र्यांनी शासकीय महापूजेनंतर व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते . मात्र तरीही दर्शनाची रांग साथ गतीने पुढे चालल्याने रात्री 10 पासून दर्शन रांगेतील भाविक अजून गोपाळपूर पत्राशेड क्रमांक आठ मध्येच अडकून पडल्याने भाविकांचा संताप वाढत गेला. यातच काही तरुण भाविकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने सर्व आठ पत्राशेडमधील भाविक या गोंधळात सहभागी झाले. यानंतर यातील काही भाविकांनी बंदोबस्ताला उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली . यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दर्शन रांग पहाटेच सुरु झाल्याचे सांगूनही भाविकांचे समाधान न झाल्याने काही टारगट तरुण भाविकांनी मंदिर समिती मुर्दाबादच्या घोषणाबाजीला सुरुवात केली .
खरेतर यंदा मुख्यमंत्र्यांनी इतके चांगले निर्णय घेऊन आणि यात्रा समन्वयासाठी नेमलेले गिरीश महाजन आणि डॉ तानाजी सावंत या मंत्र्यांनी सक्त सूचना देऊनही दर्शन रांगेतील व्यवस्था ढेपाळत गेली. यातूनच भाविकांचा संताप बाहेर आला.