(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakshabandhan Travel : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक, भारतातील अनोखे मंदिर! जिथे मूर्ती किंवा फोटोची पूजा केली जात नाही
Rakshabandhan Travel : तुम्हालाही तुमच्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी भावा-बहिणीच्या प्रेमाला समर्पित असलेल्या मंदिराला भेट द्यायची असेल, तर तुम्ही भारतातील या मंदिराला भेट द्यावी.
Rakshabandhan Travel : यंदा रक्षाबंधन 19 ऑगस्टला आहे. अवघ्या काही दिवसांवर हा सण येऊन ठेपलाय. बहिण भावाचा खास सण रक्षाबंधन भारतीय संस्कृतीत या दोघांच्या नात्याचे महत्त्व दर्शवतो. या दिवशी एक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य, सुख, समृद्धी तसेच सुरक्षिततेसाठी शुभेच्छा देते. भाऊही बहिणीच्या रक्षणाचं वचन देतो. तसं पाहायला गेलं तर भारतात अनेक रहस्यमयी आणि चमत्कारी मंदिरं आहे. तुम्ही देवी-देवतांची अनेक मंदिरं पाहिली असतील, परंतु बहिण-भावाच्या प्रेमाचं प्रतिक असलेले मंदिर तुम्ही कदाचित पाहिले नसेल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराबाबत सांगणार आहोत. जिथे भावा-बहिणीच्या नात्याची पूजा केली जाते. रक्षाबंधननिमित्त येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.
हे मंदिर कुठे आहे?
रक्षाबंधनच्या निमित्ताने भाऊ-बहिण पहाटे आंघोळ करून मंदिरात जातात. देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाला समर्पित भारतातील या मंदिराचे नाव भैय्या बहिनी आहे. हे मंदिर बिहारमधील सिवान जिल्ह्यात भिखाबंध गावात आहे. बहिणी आपल्या भावांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यासाठी येथे येतात. या मंदिराशी संबंधित एका प्रमुख मान्यतेनुसार, येथे भाऊ-बहिण एकत्र पूजा करतात, तर त्यांच्या नात्यात स्नेह आणि विश्वास कायम राहतो. हे भारतातील सर्वात खास मंदिरांपैकी एक आहे. कारण बिहारमधील हे एकमेव मंदिर आहे.
भैय्या-बहिनी मंदिर प्रसिद्ध का आहे?
या मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे येथे कोणत्याही मूर्ती किंवा फोटोची पूजा केली जात नाही. येथे भाऊ-बहिणी मंदिराबाहेर लावलेल्या मातीची पिंड आणि वडाच्या झाडांची पूजा करण्यासाठी येतात. येथे अनेक वटवृक्ष आहेत जे एकमेकांना जोडलेले आहेत. येथेच एक छोटेसे मंदिर बांधण्यात आले आहे.
या मंदिराला कसे जायचे?
या मंदिराला भेट द्यायची असल्यास जवळचे विमानतळ- पाटणा विमानतळ हे येथील सर्वात जवळचे विमानतळ आहे, जे बक्सरपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. येथून तुम्ही बस किंवा कॅब घेऊ शकता.
रेल्वेने- बक्सर हे रेल्वे स्टेशन मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्टेशन दिल्ली, पाटणा, वाराणसी आणि इतर शहरांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्यात कोणतीही अडचण येणार नाही. तुम्ही रेल्वे स्टेशनवरून ऑटो, रिक्षा किंवा टॅक्सीने पोहोचू शकता.
हेही वाचा>>>
Travel : 15 ऑगस्टचं निमित्त...अन् भारतीय रेल्वेतर्फे कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी! स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाचा इतिहास, संस्कृती जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )