World Sleep Day 2021 : 'जागतिक निद्रा दिन' जाणून घ्या 'वर्ल्ड स्लीप डे' चा इतिहास आणि महत्त्व!
आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानावर चालणाऱ्या जगात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. पुरेशा झोपेची गरज आणि महत्त्व हे लोकांना अजूनही पटत नाही. झोपेच्या अभावाने विविध आजारांना सामोरं जावं लागतं. सुदृढ आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे व ती न मिळाल्यास काय दुष्परिणाम भोगावे लागू शकतात हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा...
मुंबई : 'वर्ल्ड स्लीप डे' हा दरवर्षी मार्च महिन्यातील तिसर्या शुक्रवारी साजरा केला जातो. यावर्षी 19 मार्च म्हणजेच 'जागतिक निद्रा दिन' साजरा केला जात आहे. पहिल्यांदा निद्रा दिन 2008 मध्ये साजरा करण्यात आला. झोप आणि आरोग्य यांच्यातील संबंधाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे.
आजच्या या धावपळीच्या युगात, कामाच्या ओघात सर्वांचं झोपेचं प्रमाण कमी झालंय. याचा त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होतोय. आपलं आरोग्य सुदृढ राहावं यासाठी कमीत कमी आठ तासांची झोप पूर्ण करावी असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. यावर्षी 'जागतिक निद्रा दिनाचा विषय आहे ' नियमित झोप, आरोग्यदायी भविष्य '. या दिवसाच्या इतिहासाबद्दल जाणून घ्या!
जागतिक निद्रा दिन का साजरा केला जातो?
वर्ल्ड स्लीप सोसायटी ही संस्था वर्ल्ड स्लीप डेच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित करते. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे लोकांना बर्याच आजारांना सामोरं जावं लागतं. अगदी नकळत या अपुऱ्या झोपेचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. हे रोखण्यासाठी वर्ल्ड स्लीप सोसायटीने 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा करण्यास सुरुवात केली. आज जगातील 88 हून अधिक देशांमध्ये 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा केला जातो. पहिल्यांदा साली हा दिवस साजरा केला गेला. निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे, हे लोकांपर्यंत पोहोचावं, सर्वांना झोपेचं महत्त्व कळावं यासाठीचा हा एक प्रयत्न!
जागतिक निद्रा दिनाचं महत्त्व काय?
आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानावर चालणाऱ्या जगात लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. सकाळची न्याहरी, दुपारचं जेवण या गोष्टी पूर्वीप्रमाणे वेळेवर होत नाहीतच पण त्यात व्यायामाकडेही दुर्लक्ष होतं. कामासाठीचा बराचसा वेळ घराबाहेरच गेल्याने बाहेरचं जंक फूड खाल्लं जातं. ऑफिसच्या कामाचा, इतर अनेक गोष्टींचा तणाव, त्यात झोपही पुरेशी मिळत नाही. ज्याचा थेट परिणाम विविध आजारांतून दिसतो. केवळ शरीरावरच नाही तर मानसिक स्वास्थ्यावरही याचा मोठा परिणाम होतो.
पुरेशी झोप शरीराला मिळाली की पाहा तुमचा दिवस किती आनंदित जाईल आणि तुम्ही संपूर्ण दिवस एनर्जेटिक राहाल! वर्ल्ड स्लीप सोसायटीचं झोपेबाबत जागरुकता करण्याचं हे पाऊल कौतुकास्पद आहे. सध्या वेग वाढलेल्या या जगातून थोडा वेळ काढत झोप पूर्ण करणं आणि स्वत:ला वेळ देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हालाही जर आरोग्यदायी राहायचं असेल तर किमान आठ तासांची झोप पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि आनंदित राहा! Happy World Sleep Day!
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )