विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
Parinay Phuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप परिणय फुके यांनी केलाय.

Parinay Phuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप करत भाजपचे (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Phuke) यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. याबाबत त्यांनी एजंटसोबत झालेल्या कॉलची ऑडिओ क्लिप विधीमंडळात सादर केली आहे. प्रश्न का लावायचा नाही? लावल्यानंतर का होणार काय होणार? अशा धमक्या या ऑडिओ क्लिपमध्ये देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. परिणय फुकेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार होतो. विरोधीपक्षातील आमदार आणि त्यांचे सात ते आठ जवळचे कार्यकर्ते यात सहभागी आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, ॲाडीओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे, अशी माहिती देखील परिणय फुके यांनी दिली आहे. ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी झाल्यानंतर पोलीस कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले परिणय फुके?
याबाबत विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, गडचिरोली जिल्ह्यातील काही राईस मिल धारकांवर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या चुकांबाबत काही कारवाया झाल्या होत्या. त्या कारवाया परत करण्याची धमकी देऊन परत लक्षवेधी लावून आम्ही तुमच्यावर कारवाई करू, तुमची आम्ही राईस मिल बंद करू, तुम्हाला जेलमध्ये टाकू, अशा प्रकारच्या धमक्या देऊन राईस मिल धारकांकडून पैशांची मागणी करण्यात आली, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांना ऐकवली ऑडिओ क्लिप
या संदर्भात एका नेत्याच्या उजव्या हाताची ऑडिओ क्लिप तर डाव्या हाताची व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहे. विधान परिषदेतील लक्षवेधी सुरू होण्याच्या आधी मला राईस मिलर्सनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप पाठवल्या. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप दाखवल्या. या संदर्भात त्यांनी मला सांगितलं की, याबाबत सभागृहाला माहिती द्या. पण, जोपर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट येत नाही, सखोल चौकशी होत नाही, तोवर कोणाचेही नाव तुम्ही घेऊ नका, असेही परिणय फुके यांनी म्हटले.
ऑडिओ क्लिपमधील संवाद नेमका काय?
ऑडिओ क्लिपमधील संवाद नेमका काय? याबाबत परिणय फुके म्हणाले की, एक तर ते राजकीय आहे की, तुम्ही या पक्षाचे काम केलं, विधानसभेत तुम्ही यांच्यासोबत का काम करतात? दुसरा म्हणजे त्यात पैशाची मागणी करण्यात आली आहे. तसेच या आधी देखील लक्षवेधी लावण्याचा संदर्भात पैशांची देवाणघेवाण झाली होती, त्याचे देखील या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आणखी वाचा
























