ही घटना 10 मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी नेल्या होत्या.
मात्र, सोमवारी घरात अचानक आग लागली आणि या आगीत संपूर्ण उत्तरपत्रिकांचा गठ्ठा जळून खाक झाला आहे.
सदर घटनेने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारावीच्या उत्तरपत्रिका शाळेतच तपासणे बंधनकारक असताना देखील त्या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी कशा नेल्या? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
शिक्षण मंडळाच्या नियमानुसार, परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका सुरक्षित पद्धतीने शाळेतच तपासण्याचे निर्देश असतात.
त्यामुळे या शिक्षिकेने उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्तरपत्रिका जळल्याने अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
त्यामुळे या प्रकरणाचा तपास जलदगतीने करण्यात यावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.