World Hepatitis Day 2024: हळूहळू शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करणारा आजार, दरवर्षी 13 लाख लोक जीव गमावतात, जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जाणून घ्या..
World Hepatitis Day 2024 : हळूहळू हा आजार शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतो. जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जाणून घेऊया याचे महत्त्व आणि लक्षणं काय आहेत?
World Hepatitis Day 2024 : पावसाळ्यात आल्हाददायक वातावरणासोबतच विविध आजार देखील डोकावतात, योग्य काळजी घेतली नाही, तर या आजारांचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होतात. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यात यकृताची मोठी भूमिका असते. तर अयोग्य खाण्याच्या सवयी आणि खराब जीवनशैलीमुळे अनेक लोक हेपेटायटीससारख्या गंभीर आजारांना बळी पडतात. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हळूहळू हा आजार शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतो. आज 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. या दिनानिमित्त जाणून घेऊया याचे महत्त्व आणि लक्षणं काय आहेत?
दरवर्षी 13 लाख लोक आपला जीव गमावतात.
दरवर्षी माहितीअभावी या आजाराच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये हिपॅटायटीसच्या संसर्गाबाबत जनजागृती करणे हा हा दिवस साजरा करण्याचा उद्देश आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यकृताशी संबंधित या संसर्गामुळे दरवर्षी 13 लाख लोक आपला जीव गमावतात. लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा केला जातो. या आजारात यकृताला सूज येऊन अन्न पचण्यात अडचणी येतात. अशात त्याची लक्षणे वेळीच ओळखून उपचाराकडे वाटचाल करणे गरजेचे आहे. जागतिक हिपॅटायटीस दिवस का साजरा केला जातो, त्याची लक्षणे, उपचार, प्रतिबंधक पद्धती आणि यावर्षीची थीम या लेखात आम्ही तुम्हाला सांगू.
हिपॅटायटीस म्हणजे काय?
हिपॅटायटीसचे अनेक प्रकार आहेत, त्यापैकी हिपॅटायटीस बी सर्वात धोकादायक आहे. यामुळे सर्वप्रथम यकृतामध्ये सूज येते, ज्यामुळे पेशी खराब होतात. मग हळूहळू हा रोग शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करू लागतो आणि वेळेवर ओळखल्यानंतर उपचार न मिळाल्याने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
जागतिक हिपॅटायटीस दिवस का साजरा केला जातो?
शास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते डॉ. बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग यांच्या जन्मदिनानिमित्त 28 जुलै हा जागतिक हिपॅटायटीस दिवस म्हणून साजरा केला जातो. हेपॅटायटीस बी विषाणू (HBV) शोधणारे आणि हेप-बी विषाणूच्या उपचारासाठी निदान चाचणी आणि लस विकसित करणारे ते पहिले होते. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक हिपॅटायटीस मुक्त मोहिमेद्वारे करण्यात आली आणि 2008 मध्ये प्रथमच जागतिक हिपॅटायटीस दिवस साजरा करण्यात आला.
जागतिक हिपॅटायटीस दिनाचे महत्त्व
जगभरातील अनेक लोक यकृताच्या समस्येने त्रस्त आहेत आणि जागरूकतेच्या अभावामुळे त्यांना हेपेटायटीसचा त्रास होत असल्याची जाणीव होत नाही. अशा परिस्थितीत, या दिवसाचा विशेष उद्देश लोकांमध्ये यापासून बचाव करण्याच्या पद्धतींबद्दल जागरूकता पसरवणे आणि उपचारांसाठी योग्य चाचणीबद्दल माहिती प्रदान करणे हा आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात.
हिपॅटायटीसची लक्षणे
थकवा आणि अशक्तपणा
मळमळ आणि उलटी
त्वचा आणि डोळे पिवळे होणे
पोटदुखी
गडद पिवळी लघवी
भूक न लागणे
सांधे दुखी
ताप
वजन कमी होणे
डोळे पिवळे होणे
जागतिक हिपॅटायटीस दिवस 2024 ची थीम
जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडून दरवर्षी जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त वेगळी थीम ठेवली जाते. 28 जुलै रोजी साजरा केला जाणारा हा दिवस देखील खूप खास आहे. यंदा तो 'इट्स टाइम फॉर ॲक्शन' वर आधारित आहे.
हेही वाचा>>>
World Hepatitis Day : चुकूनही दुर्लक्ष करू नका, तुमच्या मुलांना 'हिपॅटायटीस' झाल्याचं कसं ओळखाल? 'ही' लक्षणं तर नाही ना? डॉक्टर सांगतात...
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )