National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?
National Dengue Day 2024: डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
![National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी? National Dengue Day 2024 symptoms and treatment in marathi Health news National Dengue Day 2024: डेंग्यूची लागण कशी होते, लक्षणं कोणती आणि कशी घ्याल काळजी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/24/2c56d790839163b8b2afc611e0bc58881700823483365651_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dengue fever : पुणे : डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी साठवलेल्या पाण्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करावे, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे निमार्ण होऊ देऊ नये तसेच आवश्यक दक्षता बाळगावी, असे आवाहन पुणे जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाने केले आहे. 16 मे रोजी पाळण्यात येणाऱ्या राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्यानिमित्ताने (National Dengue Day 2024) प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सूचना केल्या आहेत.
डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडिस इजिप्ती या डासाच्या चावण्यापासून होतो. या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यात होते. नागरिकांनी आपल्या घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवड्यातून एकदा रिकामे व कोरडे करुन भरावे. एक दिवस कोरडा पाळण्यात यावा. आपल्या घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. डेंग्यूचे रूग्ण नियमित स्वरूपात आढळत असून डेंग्यू आजाराच्या संख्येत ऑगस्ट, सप्टेंबर नंतर वाढ होताना दिसते. काही भागात अतिपाऊस, वाढते शहरीकरण, स्थलांतराचे प्रश्न, विविध विकासकामे अशा अनेक कारणांमुळे डेंग्यू आजाराचे प्रमाण वाढते.
डेंग्यू आजारांची लक्षणे Dengue Fever Symptoms :
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या खोबणीत वेदना, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, भूक मंदावणे, उलट्या होणे, उलट्यातून रक्त येणे, तोंडाला कोरड पडणे, रक्तमिश्रित काळसर संडास होणी ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. अशी काही लक्षणे आढळल्यास नजीकच्या जिल्हा सामान्य रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून मोफत रक्त तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. डेंग्यू आजाराच्या निश्चित निदानासाठी एलायझा टेस्ट ही परिपूर्ण चाचणी एनआयव्ही पुणे व महानगरपालिकेतील सेंटिनल येथे मोफत केली जाते.
डेंग्यू आजारावर उपाययोजना कशा कराव्यात :
डेंग्यू डासांची उत्पत्ती साठविलेल्या पाण्यात होत असल्याने पाणी व्यवस्थापन योग्य रितीने केल्यास डासांची निर्मिती व पर्यायाने हिवताप, डेंग्यूचे प्रमाण कमी होईल. यासाठी घराजवळ असलेले नाले वाहते करून डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात यावीत. तसेच नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडावेत, पाण्याच्या साठ्यांना घट्ट झाकण बसवावे, घरातील कुलर, फ्रीजचा डीप पॅन नियमित स्वच्छ करावा, गटारी वाहती करावीत व छोटे खड्डे, डबकी बुजवावीत, अंगभर कपडे घालावेत, झोपताना मच्छरदानीचा व डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा.
डेंग्यू हा आजार नागरिकांच्या सहकार्याशिवाय रोखता येणे शक्य नसल्याने यामध्ये नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. त्यामुळे डेंग्यू नियंत्रणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहसंचालक आरोग्य सेवा पुणे डॉ. राधाकिशन पवार यांनी कले आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)