16 महिन्यांत 5 वेळा हार्टअटॅक, तरिही महिला ठणठणीत; पाच स्टेंट, 6 वेळा अँजियोप्लास्टी, एक बायपास सर्जरी, डॉक्टर्सही हैराण
16 महिन्यांत 5 वेळा आला हृदयविकाराचा झटका, पाच स्टेंट, 6 वेळा अँजियोप्लास्टी, एक बायपास सर्जरी होऊनही महिला ठणठणीत, पण असं वारंवार का होतंय? डॉक्टर्सही हैराण
Mumbai News: हृदयविकार... भारतातील (India Health Updates) तब्बल 27 टक्के लोकांचा मृत्यू हृदयविकारानं (Cardiovascular Disease) होतं, असं एका रिपोर्टमधून समोर आलेलं. हृदयविकाराचा (Heart Attack) एकच झटका माणसाचं आयुष्य हिरावून घेतो. धकाधकीची जीवनशैली आणि अनियमित आहार यांमुळे अगदी तरुणांमध्येही हृदयविकारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. कधीकधी हृदयविकाराचा एकच झटका अत्यंत घातक ठरतो. पण यासर्वाला अपवाद असं एक उदाहरण समोर आलं आहे. मुंबई उपनगरांत मुलुंडमध्ये राहणाऱ्या 51 वर्षीय वृद्धाला गेल्या 16 महिन्यांत तब्बल 5 वेळा हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टर्सही हे प्रकरण पाहून हैराण झाले आहेत.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मुलुंडमध्ये (Mulund News) राहणाऱ्या महिलेला 16 महिन्यांत तब्बल 5 वेळा हृदयविकाराचा झटका आला आहे. महिलेला पाच स्टेंट टाकण्यात आले असून तिच्या तब्बल सहा अँजिओप्लास्टी आणि एक कार्डियाक बायपास सर्जरी झाली आहे. 1 ते 2 डिसेंबर दरम्यान महिलेला अखेरचा हृदयविकाराचा झटका आला होता. महिलेला आता एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की, तिची काय चूक आहे की तिला पुन्हा पुन्हा अशा परिस्थितीतून जावं लागत आहे. तसेच, पुढच्या तीन महिन्यांत पुन्हा एकदा तिच्या शरीरात नवा ब्लॉक तर तयार होणार नाही ना? अशी काळजी सध्या महिलेला सतावत आहे.
महिलेला सर्वात आधी सप्टेंबर 2022 मध्ये जयपूरहून बोरिवलीला परतत असताना ट्रेनमध्ये पहिला हृदयविकाराचा झटका आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला अहमदाबाद येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल केलं होतं. सध्या महिलेवर डॉ. हसमुख रावत हे उपचार करत आहेत. डॉ. रावत यांनीच महिलेच्या दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास शस्त्रक्रिया केल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियानं डॉक्टरांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे की, "महिलेला वारंवार येणाऱ्या हृदयविकारांच्या झटक्यांचं कारण एक गूढच राहिलं आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, व्हॅस्क्युलायटिस सारखा ऑटो-इम्यून आजार याचं कारण असू शकतं. या आजारात रक्तवाहिन्या सूजतात आणि रक्तप्रवाहाचा मार्ग अरुंद होतो. पण महिलेच्या आजाराच्या निदानात अद्याप कोणतंही स्पष्ट कारण सापडलेलं नाही.
महिलेच्या शरीरात हृदयविकाराची लक्षणं काहीच महिन्यांत परततात
काही महिन्यांच्या अंतरानं महिलेच्या शरीरात हृदयविकाराची लक्षणं पुन्हा आढळून येतात. महिलेला छातीत दुखणं, ढेकर येणं आणि अस्वस्थ जाणवणं यांसारखी लक्षणं जाणवू लागतात. महिलेलं याबाबत बोलताना सांगितलं की, मला फेब्रुवारी, मे, जुलै आणि नोव्हेंबरमध्ये हृदयविकाराचा झटका आला. महिलेला मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यांसारख्या इतर समस्याही आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये तिचं वजन 107 किलो होतं आणि तेव्हापासून तिचं वजन केवळ 30 किलोंनीच कमी झालं आहे. महिलेला कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 'पीसीएसके9 इनहिबिटर' औषधाचं इंजेक्शन देण्यात आलं आहे, त्यामुळे महिलेच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी काही अंशी कमी झाली असून मधुमेहही नियंत्रणात आहे, मात्र हृदयविकाराच्या झटक्यांचं सत्र सुरूच आहे.
पुन्हा पुन्हा नवे ब्लॉकेजेस निर्माण होतात : डॉ. रावत
डॉ. रावत म्हणाले की, रुग्णांना एकाच ठिकाणी वारंवार ब्लॉकेजेस होतात, हे माहीत असलं तरी महिलेच्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी नवीन ब्लॉकेजेस विकसित होत आहेत. ते म्हणाले की, "तिला पहिला हृदयविकाराचा झटका डाव्या धमनीत 90 टक्के ब्लॉकेजमुळे आला होता आणि पुढच्या वेळी उजव्या कोरोनरी धमनीत 99 टक्के ब्लॉकेज असल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला'. वैद्यकीयदृष्ट्या, महिला नशीबवान ठरली, कारण तिला हृदयविकाराचा झटका NSTEMI किंवा नॉन-एसटी-एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन होता जो हृदयाच्या ऑक्सिजनच्या गरजा पूर्ण न झाल्यास होतो.
ही दुर्मिळ ऑटो-इम्यून स्थिति असू शकते, डॉक्टरांचा दावा
डॉ. हसमुख रावत म्हणाले की, एसटीईएमआय हार्टअटॅक एनएसटीईएमआयपेक्षा जास्त धोकादायक आहे. विविध 8 शस्त्रक्रिया करूनही, महिलेच्या हृदयाचे इजेक्शन फ्रॅक्शन 45 टक्के आहे, जे उत्तम आहे. केईएम हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन सांगतात की, असा 'घातक एथेरोस्क्लेरोसिस (धमन्यांचे कडक होणं)' दुर्मिळ आहे. डॉक्टरांनी सुनीताचे लिपिड्स अनेक महिन्यांपासून कमी ठेवलं आहे, तिचं स्टेंटिंग आणि बायपास केल्यामुळे, तरीही समस्या पुन्हा उद्भवते. डॉ. महाजन म्हणाले की, 'म्हणून ही एक दुर्मिळ ऑटो-इम्यून स्थिति असू शकते.'
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )