Health Tips : डोळ्यांशी संबंधित आजारांविषयी जागरूक राहा; रेटिनाच्या आरोग्यासाठी 'हे' आहेत प्रतिबंधात्मक उपाय
Health Tips : रेटिनाचे आरोग्य जपण्यासाठी प्रतिबंधात्मक देखभाल करणे गरजेचे आहे.
Health Tips : मानवी शरीराला एखाद्या आजाराची लागण झाल्यास त्या संदर्भात काळजी घेण्यासाठी अनेक उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, रेटिनाच्या संदर्भात अजूनही तितक्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. रेटिनाचा आजारसुद्धा दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या आजारांचे परिणाम अगदी कमी वयापासूनच दिसू लागतात. मात्र त्याबाबत जागरुकता नसल्याने लक्षणे गंभीर दिसू लागल्यावरच त्याकडे लक्ष दिले जाते.
एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) आणि डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) यांसारख्या आजारांचे योग्य वेळी अचूक व्यवस्थापन केले गेले नाही तर दृष्टी बऱ्यापैकी अधू होऊ शकते किंवा गमवावी लागू शकते. एएमडीमुळे मध्यवर्ती दृष्टीवर परिणाम होतो. हा आजार वयोवृद्ध व्यक्तींमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. डीआरमुळे मधुमेहींच्या रेटिनातील रक्तवाहिन्यांना इजा होते आणि त्यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते किंवा नजर कमकुवत होऊ शकते.
या संदर्भात मुंबई रेटिना सेंटरचे सीईओ विट्रेओरेटिनल सर्जन डॉ. अजय दुदानी म्हणाले, ‘’भारतात सामान्य डोळ्यांच्या आजारांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रतिबंधात्मक अंधत्व आणि दृष्टीदोषामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वैद्यकीय निरीक्षणानुसार जवळपास 50 टक्के रूग्ण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच डायबेटिक रेटिनोपॅथी (डीआर) आणि एज-रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन (एएमडी) यांसारख्या रेटिनल आजारांमुळे रेटिनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर नेत्ररोग तज्ञांना भेट देतात. तसेच जीवनशैलीमधील बदल डीआर आणि एएमडीच्या प्रतिबंधामध्ये प्रमुख भूमिका बजावतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे, लिपिड आणि कोलेस्ट्रॉल पातळ्या योग्य राखणे आणि लठ्ठपणा सारख्या इतर कोमोर्बिड आजारांचा उपचार करणे हे डीआरसाठी महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक आरोग्यदायी उपाय आहेत. एएमडीसाठी यूव्ही किरणे टाळणे किंवा थेट सूर्यप्रकाशात न जाणे, रक्तदाबावर नियंत्रण आणि धूम्रपान बंद करणे हे अनिवार्य आहे. ल्युटीन संपन्न आहार – अंड्यातील पिवळे बलक, हिरव्या पालेभाज्या, मका, लाल बिया नसलेली द्राक्षे हे एएमडी विकसित होण्याला प्रतिबंध करण्यासाठी उत्तम पौष्टिक सप्लीमेंट्स आहेत.’’
रेटिनाच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
दृष्टी अधू होणे हा काही म्हातारपणाचा अटळ परिणाम नव्हे आणि या स्थितीची चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे शक्य आहे. जुनाट आजारांमुळे रेटिनाचे आरोग्य ढासळण्याच्या बाबतीतही हेच सांगता येईल. चांगला आहार, निरोगी जीवनशैली आणि वेळोवेळी करून घेतलील नेत्रतपासणी यांच्या मदतीने रेटिनाची हानी टाळता येते. त्यासाठीच्या काही उपाययोजना तुम्ही जरूर करून पाहू शकता:
डोळ्यांशी संबंधित आजारांविषयीची जागरुक राहा
तुमच्या डोळ्यांना कोणत्या आजारांचा त्रास होऊ शकतो व त्यांना कसे रोखायचे याविषयी जागरुक रहा. तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल तर त्यामुळे तुमच्या रेटिनावर परिणाम होऊ शकतो का याविषयी आपल्या डॉक्टरांशी चर्चा करा आणि कोणतीही दुखापत रोखण्यासाठी त्याचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करा.
वेळोवेळी नेत्रतपासणी करून घ्या
रेटिनाचे आरोग्य जपण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ऑप्टोमीटरिस्ट किंवा ऑप्थॅल्मोलॉजिस्टकडून नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घेणे. यामुळे आजाराला प्रतिबंध करता येतो किंवा एखाद्या स्थितीचे सुरुवातीच्या टप्प्यावरच निदान होते. यामुळे ती स्थिती अधिक चांगल्या प्रकारे सांभाळण्यास मदत होते आणि दृष्टी गमावणे रोखता येते.
उपचारांचे काटेकोर पालन करा
तुमच्या डोळ्यांची आर्द्रता टिकविण्यासाठी ड्रॉप्सची गरज आहे किंवा नाही, किंवा प्रगत टप्प्यावर पोहोचलेल्या एएमडीसाठी लेझर थेरपीची गरज आहे किंवा नाही हे केवळ विशेषज्ज्ञच ठरवू शकतात. तेव्हा तुमच्यासाठी कोणती उपचारपद्धती योग्य आहे हे डॉक्टरांना ठरवू द्या आणि तुम्ही त्या उपचारांचे काटेकोरपणे पालन करा म्हणजे त्यांचे सर्वात चांगले परिणाम तुम्हाला मिळतील.
रक्तदाब, रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि कॉलेस्ट्रॉल यांच्यावर नियमितपणे देखरेख ठेवा
रक्तदाब आणि कॉलेस्ट्रॉलवर नियमितपणे देखरेख ठेवणे हे हृदय आणि डोळ्यांसह इतर इंद्रियांची हानी रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मधुमेहींच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्यास त्याची परिणिती DR मध्ये होऊ शकते.
संतुलित आहार घ्या
अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशनने (American Optometric Association) डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपल्या आहारात काही विशिष्ट पोषक घटकांचा नियमितपणे समावेश करण्याचे महत्त्व ठळकपणे मांडले आहे. पालक, केल (Kale) आणि अंडी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास त्यामुळे दुर्धर नेत्रविकारांचा धोका कमी होऊ शकतो. बऱ्याच फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये आढळणाच्या क जीवनसत्वमुळे उतारवयात नजर अधू होण्याची प्रक्रिया मंदावू शकते. फ्लॅक्ससीड्स, चीया सीड्स, अक्रोड आणि मासे यांसारखे ओमेगा-3 फॅटी आम्लांचे उत्तम स्त्रोत असलेले पदार्थ हे मेंदूला दृश्य संदेश पाठविणाऱ्या रेटिनाचे कार्य चांगल्या प्रकारे सुरू राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Diabetes Diet : मधुमेहामध्ये रात्रीच्या जेवणाची अशी घ्या काळजी; आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश
- Weight Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )