Health : तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय ठरतेय धोकादायक! बैठ्या जीवनशैलीमुळे वाढतंय पाठीचं दुखणं, डॉक्टर म्हणतात..
Health : सध्या अनेकांना ऑफिसमध्ये खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय असते, मात्र ही सवय तुमच्या पाठदुखीस कारणीभूत ठरू शकते
Health : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे तसेच वाढत्या वयामुळे लोकांमध्ये पाठदुखीची समस्या वाढत आहे. जड ओझे उचलणे, सतत खाली वाकणे, जड वस्तू अयोग्य पद्धतीने उचलणे, सांधेदुखी, हाडे ठिसूळ होणे, मणक्याला मार बसणे, व्यायाम न करणे ही कारणं तुमची पाठदुखी वाढवतात. मात्र या कारणांपेक्षाही आणखी एक कारण असं आहे, ज्यामुळे तुमची पाठदुखीचं प्रमाण वाढू शकते. सध्या अनेकांना कार्यालयातील खुर्चीत तासन्तास एकाच स्थितीत बसण्याची सवय पाठदुखीस कारणीभूत ठरते. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना पाठदुखीची समस्या सतावते. हे दुखणे तुमच्या दैनंदिन जीवनशैलीवर नकारात्मक परिणाम करते. तीव्र पाठदुखी शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या थकवा आणणारी असू शकते. ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. म्हणून पाठदुखीकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. याबाबत ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन डॉ आयुष शर्मा यांनी महत्त्वाची माहिती दिलीय..
पाठदुखी नेमकी कशामुळे होते?
बैठी जीवनशैली : कामाचे वाढते तास, व्यस्त जीवनशैली ही तुमच्या मणक्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. ज्यामुळे पाठदुखीचा त्रास होतो. शारीरिक हालचालींचा अभाव आणि दीर्घकाळ स्क्रीन्ससमोर बसल्याने तुमचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. पोक काढून बसणे किंवा चुकीच्या स्थितीत बसणे यांसारख्या सवयींमुळे मणक्याचे दुखणे वाढते.
लठ्ठपणा : लठ्ठपणाचा त्रास असलेले लोक अनेकदा पाठदुखीची तक्रार करताना दिसतात, जे काही महिने किंवा वर्षांपर्यंत टिकून राहतात. जास्त वजनामुळे तुमच्या मणक्यावर, विशेषतः पाठीच्या खालच्या भागावर अतिरिक्त ताण येतो. दुर्लक्ष केल्यास दैनंदिन कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
धूम्रपान : धूम्रपानाच्या सवयी तुमच्या मणक्याच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात. यामुळे मणक्यातील डिस्कचे नुकसान होऊन त्याची झीज होते. निकोटीन, सिगारेटमध्ये असलेले हानिकारक द्रव्य मणक्यातील रक्त प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता वाटू लागते.
दुखापत : पाठीच्या दुखापती जसे की पाठीवर येणारा अतिरिक्त ताण, अचानक दुखापत होणे तसेच फ्रॅक्चरमुळे तुमच्या मणक्याचे आरोग्य बिघडू शकते. अपघात, घसरुन पडणे, जड वजन उचलणे आणि जास्त प्रमाणात शारीरिक व्यायाम केल्याने पाठीच्या दुखापती होऊ शकतात. या दुखापतींकडे किरकोळ वेदना म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
स्लीप डिस्क : पाठीचा मणका हा 26 हाडांनी बनलेला असतो. प्रत्येक हाडांच्यामध्ये मऊ चकती असते. ही चकती दोन भागात असते. चकतीचा आतला भाग मऊ, मांसल असतो तर बाहेरचे कवच कठीण असते. कोणतीही जखम किंवा आजारपण यांमुळे चकतीचा मऊ भाग कठीण कवचाच्या बाहेर ढकलला जातो. यालाच स्लिप डिस्क म्हणतात. यामुळे गंभीर पाठदुखी होते.
तणाव : झोपेचा अभाव, नैराश्य किंवा चिंता यासह पाठीच्या वेदना होतात.
अँकिलोझिंग स्पॉन्डिलायटिस : हा एक प्रकारचा संधिवात आहे, जो पाठीच्या कण्यावर दुष्परिणाम करतो, ज्यामुळे मणक्यामध्ये जळजळ होते. यामुळे एखाद्याला पाठदुखीची समस्या सतावू शकते.
सायटिका : ही एक अशी स्थिती आहे, जी सायटिक नर्व्हच्या मार्गावर पसरते, जी पाठीच्या खालच्या भागातून, नितंब आणि पायातून खाली जाते. यामुळे तुमच्या कंबरेपासून ते पायापर्यंत असह्य वेदना होतत. या स्थितीत कंबरेपासून पायाच्या मागच्या भागातून खाली पसरणारी तीक्ष्ण वेदना होतात.
पाठदुखी कशी टाळाल?
- चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते.
- विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे.
- जास्त प्रमाणात पाठदुखी होत असेल तर नियमित योगासने करा, त्यामुळे स्नायूंची क्षमता वाढते आणि पाठीचा कणा लवचिक बनतो.
- मणक्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी दररोज किमान 5 मिनिटे स्ट्रेचिंग करा.
- जर तुम्ही जास्त वेळ एकाच ठिकाणी बसत असाल कर तर एक किंवा दोन तासांनंतर वारंवार ब्रेक घ्या.
- तुमच्या पाठीला आधार देण्यासाठी तुम्ही कुशन्सचा वापर करु शकता.
- हाडे मजबूत ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स, लोह, जस्त, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स यांसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समावेश निरोगी आणि पोषक आहार घ्या.
- दुखापतीमुळे किंवा स्पॉन्डिलायटिसमुळे पाठदुखी झाल्यास, पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे, फिजिओथेरेपी, शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू शकते.
- एखाद्याची पाठदुखी दिवसेंदिवस वाढत असल्यास शस्त्रक्रिया हा शेवटचा पर्याय ठरतो.
- तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि पाठीची अत्यंत काळजी घ्या.
हेही वाचा>>>
Women Health: महिलांनो...मासिक पाळीला कमजोर समजू नका, हे तर ताकदीचे लक्षण! पीरियड पॉवरबद्दल जाणून आश्चर्यचकित व्हाल..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )