स्तनाच्या कर्करोग रुग्णांच्या वेदना कमी होणार! कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात संशोधन
स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांच्या वेदना आता कमी होणार आहे. सामान्य पेशींना अपाय न करता स्तनाच्या कर्करोगावर उपचार करण्याचं संशोधन शिवाजी विद्यापीठात करण्यात आले आहे.
कोल्हापूर : स्तनांच्या कर्करोगावर कोल्हापुरातल्या रसायशास्त्र विभागातील शास्त्रज्ञांनी संशोधन केलंय. त्यामुळं कर्करुग्णांच्या वेदना कमी होण्यास आता मदत होणार आहे. जगभरामध्ये या रोगावर संशोधन सुरु असलं तरी कोल्हापुरात झालेलं संशोधन त्यामध्ये सरस ठरताना दिसतंय.
महाराष्ट्रातच नाही तर देशात स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण मोठ्या संख्येनं वाढत आहेत. यावर जगभर संशोधन सुरु आहे. मात्र, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात झालेलं संशोधन थोडं वेगळं आहे. शरीरातील सामान्य पेशींना अपाय न करता स्तनाच्या कर्करोगावर उपचार होऊ शकतात. या संशोधनाला भारतीय पेटंट देखील मिळालंय. डॉ. गजानन राशिनकर आणि डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही कामगिरी केली आहे. केमोथेरपी उपचारादरम्यान रुग्णांना औषधांच्या दुष्परिणामांना समोरं जावं लागतं. या संशोधनातून मात्र सामान्य पेशींना खूप कमी प्रमाणात धोका आहे.
Health Tips | कमी कॅलरी अन् व्यायामानंतरही वाढतंय वजन? 'ही' कारणं तर नाहीत?
कर्करोगावरील केमोथेरपी उपचारामध्ये चांदी, सोने आणि प्लॅटिनम या धातूंना विशिष्ट गुणधर्मामुळं खूप महत्व आहे. पण या धातूंचा सामान्य पेशींवर देखील वाईट परिणाम होतात. कर्करोगावरील सध्याची औषधं सामान्य पेशी आणि कर्करोगाच्या पेशी यातला फरक ओळखण्यात कमी पडतात. त्यामुळं रुग्णांना औषधांच्या दुष्परिणामांना देखील सामोरं जावं लागतं. मात्र, आता झालेल्या संशोधनात हे दुष्परिणाम कमी करण्यात आले आहेत.
स्तनाचा कर्करोग हा जटील आजार आहे. त्यामुळे महिलांचा जागतिक मृत्यूदर देखील अधिक आहे. यावर उपचार करताना शरीरातील इतर पेशी मृत होत असतात. मात्र, या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या फेरोसीफेन औषधामुळं इतर पेशी वाचवता येणार आहेत. शिवाय नेमकेपणाने कर्करोगाच्या पेशी मारल्या जाणार आहेत. या दोन्ही शास्त्रज्ञांनी सलग सात वर्षे यावर काम करुन 2018 साली पेटेंटसाठी नोंदणी केली. विविध स्तरांवरील शास्त्रीय परिक्षणानंतर भारत सरकारनं 22 जानेवारीला पेटंट प्रमाणपत्र दिलं. त्यामुळं भविष्यात स्तनाच्या कर्करोगापासून होणारा महिलांचा मृत्यूदर काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )