Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
Dagdu Sakpal Shivsena: सध्या तरी दुसऱ्या पक्षात जाणार नाही, पण कुणाला गरज वाटलीच तर विचार करू असं ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर त्यांनी हे वक्तव्य केलं.

मुंबई : महापालिका निवडणुका तोंडावर असताना ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसताना दिसत आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीत मुलीला उमेदवारी मिळाली नसल्याने दगडू सकपाळ (Dagdu Sakpal) नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच आता मतदान अवघ्या काही दिवसांवर असताना शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. दगडू सकपाळ यांची मुलगी रेश्मा सकपाळ या वॉर्ड क्रमांक 203 मधून ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. मात्र पक्षाने रेश्मा सकपाळ यांना उमेदवारी नाकारून भारती पेडणेकर यांना उमेदवारी दिल्याने दगडू सकपाळ नाराज आहेत अशी चर्चा होती. मात्र आपल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते, दुसरं तिसरं काहीही नाही, असं स्पष्टीकरण सकपाळ यांनी दिलं आहे.
Dagdu Sakpal Shivsena : 'पक्षाला आमची गरज संपली'
माजी आमदार दगडू सकपाळ म्हणाले की, "जोपर्यंत गरज होती तोपर्यंत पक्षासाठी काम केलं. आता गरज संपली, पक्षाकडून विचारणाही होतं नाही. एक फोन जरी आला असता तरी समाधान होतं, मात्र पक्षाकडून विचारणाच होत नसेल तर घरी बसलेलं बरं. मी आजारी आहे हे एकनाथ शिंदेंना कोणीतरी सांगितलं, तेव्हा ते माझा भेटीसाठी आले. सोबत राणेंचे चिरंजीव, देवरांचे चिरंजीव होते."
दगडू सकपाळ म्हणाले की, "मी पक्षात नाराज आहे नक्की, पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही. जो काही आहे, जे काही मिळालं ते त्यांच्यामुळेच. मी फक्त मुलीसाठी एक जागा मागितली होती. पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागा दिल्या, त्यांनी कधी पक्षासाठी रक्त सांडलं आहे का? अशी खंत शिवसेनेचे नेते दगडू सकपाळ यांनी बोलून दाखवली. तसेच अजून कुठे दुसरीकडे जाण्याचा विचार नाही केला, पण कुणाला गरज वाटली तर पुढे विचार करू असा सूचक इशाराही सकपाळ यांनी दिला."
ही बातमी वाचा:




















