Health Tips : हिवाळ्यातील 'फ्लू लस' मुलांना संसर्गांपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग; पालकांनी 'अशी' घ्यावी मुलांची काळजी
Health Tips : हिवाळ्यात तापमानात झालेला बदल आणि कमी झालेली प्रतिकारशक्तीमुळे मुलांना फ्लूचा त्रास होतो. त्यामुळे मुलांचे फ्लू लसीकरण करणे गरजेचे आहे.

Health Tips : हिवाळ्यातील वाढत्या थंडीबरोबरच लहान मुलांना सर्दी, खोकला आणि फ्लू (Flu) यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण देखील वाढते. तापमानात झालेला बदल आणि कमी झालेली प्रतिकारशक्ती यामुळे मुलांना फ्लूचा त्रास होतो. त्यामुळे हिवाळ्याच्या (Winter) सुरुवातीला मुलांचे फ्लू लसीकरण करणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरते.
याच संदर्भात डॉ. संजू सिदाराद्दी, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणतात की, 'हिवाळा जवळ आला असून पालकांनी आपल्या मुलांची नियमित वैद्यकीय तपासणी आणि फॉलो-अप करून त्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय फ्लू लसीकरण मुलांसाठी महत्त्वाचे असून ते वगळू नये. हिवाळ्यात बहुतेकदा नाक वाहणे, खोकला आणि ताप येणे, घसा खवखवणे आणि थकवा अशा समस्या आढळून येतात. हे सामान्य असले तरी लहान मुलांमध्ये हे बऱ्याचदा गंभीर गुंतागुंत निर्माण करु शकतात कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पुर्णतः विकसित झालेली नसते. शिवाय, हंगामी इन्फ्लूएंझा किंवा "फ्लू" शाळा आणि खेळाच्या मैदानांतून सहज पसरतो ज्यामुळे उच्चदाब, अंगदुखी आणि कधीकधी न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिस, श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो. काही मुलांना त्वरित व्यवस्थापन आणि पुनर्प्राप्तीसाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
'फ्लू लस' मुलांना संसर्गांपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग
फ्लू लस ही मुलांना संसर्गांपासून वाचवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. पाच वर्षाखालील मुले आणि दमा किंवा मधुमेह सारख्या पूर्व-अस्तित्वातील आजार असलेल्यांना फ्लूशी संबंधित गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. लसीकरण केवळ मुलाला निरोगी ठेवत नाही तर कुटुंबातील सदस्यांना आणि वर्गमित्रांना विषाणू पसरण्यापासून देखील प्रतिबंधित करते. बरेच पालक लसीकरणाच्या फायद्यांकडे दुर्लक्ष करतात आणि गैरसमजुतींमुळे किंवा दुष्परिणामांच्या भीतीमुळे लसीकरण वेळापत्रक पाळण्यात अयशस्वी होतात. ही लस सुरक्षित असून सहसा हात दुखणे किंवा थोडा ताप यांसारख्या सौम्य प्रतिक्रिया दिसून येतात आणि त्यानंतर दोन दिवसांतच मुलांना बरे वाटू लागते. हिवाळा सुरू होण्यापूर्वीच तुमच्या मुलांना फ्लू लसीकरण करून सुरक्षित ठेवता येईल.
पालकांनी मुलांची 'अशी' घ्यावी काळजी
लसीकरणाव्यतिरिक्त, पालकांनी मुलांना वैयक्तिक स्वच्छता राखण्यास, नियमित हात धुण्यास, आजारी लोकांशी संपर्क टाळणे आणि फळे आणि हिरव्या भाज्यांनी समृद्ध असा पुरक आहार घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. लहान मुलांना किमान 7 ते 8 तास पुरेशी झोप मिळावी तसेच मुलांच्या शारीरिक हालचालींना पालकांनी प्रोत्साहन द्यावे. हिवाळ्यात मुलांना उबदार कपडे घाला, त्यांना पाणी, सूप, लिंबू पाणी देऊन हायड्रेटेड ठेवा आणि संसर्ग टाळण्यासाठी खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात अथवा रुमाल ठेवण्याची सवय लावा. लक्षात ठेवा, लसीकरण केवळ त्या मुलाचेच नाही तर त्यांच्या आजूबाजूच्या वावरणाऱ्या इतरांचेही रक्षण करते, आजारपणामुळे शाळा बुडणे आणि प्रकृती ढासळणे टाळता येते.
- डॉ. संजू सिदाराद्दी, बालरोग आणि नवजात शिशु तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई
हे ही वाचा :
Health Tips : पालकांनो, व्हायरल तापानंतर 'अशी' घ्या मुलांची काळजी; वाचा काय करावं आणि काय करु नये?
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
























