Guru Govind Singh Jayanti 2022 : आज गुरु गोविंद सिंह जयंती, महाराष्ट्राशी त्यांचा खास संबंध, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
Guru Govind Singh Jayanti 2022 : गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रात कसे आले आणि नांदेडलाच त्यांनी का निवडलं? आज गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
Guru Govind Singh Jayanti 2022 : शिखांचे 10 वे आणि शेवटचे गुरु गोविंद सिंह (Guru Govind Singh) यांची आज 29 डिसेंबर रोजी जयंती साजरी होत आहे. त्यांची जयंती गुरु गोविंद सिंह प्रकाश पर्व म्हणूनही ओळखली जाते. यानिमित्ताने गुरुद्वारांमध्ये भजन, कीर्तन, लंगर आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गुरू गोविंद सिंह यांनी शीख धर्मासाठी अनेक नियम बनवले, जे आजही पाळले जातात. त्यांनी शिखांसाठी पाच ककारांचा नियम केला आणि खालसा पंथाची स्थापना केली. त्यासाठी त्यांनी खालसा वाणीही दिली, ज्याबद्दल बोलताना आजही लोकांमध्ये उत्साह संचारतो. दरम्यान शीख धर्माचा आणि गुरू ग्रंथ साहिबचा महाराष्ट्राचा अत्यंत निकटचा संबंध आहे. नेमका काय संबंध आहे? गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
वडिलांनंतर वयाच्या 9 व्या वर्षी सिंहासन स्वीकारले
शिखांचे दहावे गुरु गुरू गोविंद सिंह यांचा जन्म 22 डिसेंबर 1666 रोजी पटना साहिब येथे झाला. मात्र तिथीनुसार त्यांचा जन्म पौष शुक्ल सप्तमीला झाला. यामुळे त्यांची जयंती डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात येते. गुरु गोविंद सिंह यांच्या वडिलांचे नाव गुरु तेग बहादूर आणि आईचे नाव गुजरी होते. वडील तेग बहादूर हे शिखांचे 9 वे गुरु होते. वडील तेग बहादूर जी यांच्या बलिदानानंतर गुरू गोविंद सिंह जी यांनी वयाच्या 9 व्या वर्षी सिंहासन स्वीकारले. अशा प्रकारे ते शिखांचे 10 वे गुरु बनले. गुरु गोविंद सिंह हे लहानपणापासूनच एक शूर, शूर आणि कुशल योद्धा होते. ते लहानपणीच धनुष्यबाण चालवायला शिकले होता.
अनेक भाषांचे ज्ञान
युद्धकौशल्याशिवाय त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते. संस्कृत, हिंदी, पर्शियन याशिवाय अनेक स्थानिक भाषाही त्यांना अवगत होत्या. गुरु गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी 1699 मध्ये बैसाखीच्या मुहूर्तावर खालसा पंथाची स्थापना केली. या पंथाचा मुख्य उद्देश धर्माचे रक्षण करण्याबरोबरच दानधर्म करणे हा होता. त्यासाठी त्यांनी “वाहेगुरु जी का खालसा, वाहेगुरु जी की फतह” अशी खालसा वाणी दिली. या वाणीमुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. गुरू गोविंद सिंहजी यांनी सर्व शीखांना केस, कडा, कंगवा, कचेरा आणि कृपाण अशा पाच ककारांचा सांभाळ करण्यास सांगितले. ज्याचे आजही पालन केले जाते.
प्रेरणा आणि मार्गदर्शक म्हणून 'गुरु ग्रंथ साहिब'
गुरु गोविंद सिंह जी यांनी लोकांना त्यांच्या स्वाभिमानाचे धैर्याने संरक्षण करण्यास सांगायचे. समाजात परस्पर बंधुभाव वाढावा, भेदभाव व दुष्कृत्ये दूर करण्याचे काम ते करत असत. यानंतर, गुरू गोविंद सिंह जी यांनी गुरु परंपरा संपवली आणि गुरु ग्रंथ साहिब हे शिखांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शक म्हणून वर्णन केले. गुरु गोविंद सिंह हे दया आणि त्यागाचे खरे प्रतीक होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब मुघलांशी झालेल्या युद्धात शहीद झाले. त्यांचे दोन मुलगे युद्धात शहीद झाले आणि मुघलांनी दोन मुलगे भिंतीत जिवंत गाडले. गुरु गोविंद सिंग यांनी ऑक्टोबर 1708 मध्ये देह सोडला.
महाराष्ट्राशी संबंध
शीख धर्माचा आणि गुरू ग्रंथ साहिबचा महाराष्ट्राचा अत्यंत निकटचा संबंध आहे. असं म्हणतात की, गुरु गोविंद सिंह यांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवस नांदेड, महाराष्ट्र येथे घालवले. गुरू गोविंद सिंह 07 ऑक्टोबर 1708 रोजी नांदेड, महाराष्ट्र येथे दिव्य ज्योतीत लीन झाले. या संदर्भात नांदेड हजूर साहिबलाही शीख धर्मात विशेष महत्त्व आहे. त्यांच्या निर्वाणानंतरही येथे सामुदायिक स्वयंपाकघर (लंगर) सुरू राहावे, ही गुरु गोविंद सिंह यांची इच्छा होती. ही परंपरा आजही चालू आहे आणि वर्षभर येथे लंगर चालतो. नांदेड इथे त्यांनी देहधारी गुरूंची परंपरा समाप्त करत गुरू ग्रंथ साहिबला (गुरू-ता-गद्दी) गुरूपदी विराजमान केलं.
प्रत्येक शीखानं एकदा तरी नांदेडला यावं.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये असतानाच गुरू गोविंद सिंह यांनी देहधारी गुरूंची परंपरा संपवण्याचा निर्णय घेतला होता. स्वतःनंतर गुरू ग्रंथ साहिबला प्रस्थापित करण्याचाही निर्णय त्यांनी इथंच घेतला." "नांदेड इथंच त्यांनी खालसा पंथाला आदेश दिला की, यानंतर कायमचं गुरूपद हे गुरू ग्रंथ साहिबला असेल. जन्माला आलेल्या प्रत्येक शीखानं त्याच्या आयुष्यात एकदा तरी नांदेडला यावं.
गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रात कसे आले?
गुरू गोविंद सिंह महाराष्ट्रात कसे आले आणि नांदेडलाच त्यांनी का निवडलं? याबद्दल विविध मतं आहेत. असं म्हणतात, गुरू गोविंद सिंह यांचं औरंगजेबाशी युद्ध झालं. त्यानंतर ते मध्य प्रदेशमार्गे नांदेडला आले. नांदेडचा गोदावरी नदीलगतचा नगीना घाट परिसर त्यांना फारच आवडला. इथेच वास्तव्य करावं असं त्यांनी ठरवलं. चमकोरची लढाई आणि सातत्यानं सुरू असलेल्या धावपळीमुळे त्यांना विश्रांती हवी होती. त्यांच्या पत्नी आणि गुरू मातासाहेब सुद्धा इथंच राहत असतं. सैनिकांना आणि सेवकांना त्या हातानं जेवण करून वाढत अशी माहिती ऐकायला मिळते. गुरू गोविंद सिंह यांनी जिथं अंतिम श्वास घेतला तिथंच महाराजा रणजितसिंग यांनी गुरूद्वारा बांधली. नांदेडलाच गुरू गोविंद सिंह यांनी सप्टेंबर 1708 च्या पहिल्या आठवड्यात वैरागी साधू माधोव दास यांना शीख धर्माची दीक्षा दिली आणि बंदासिंह बहादूर असं त्यांच नामकरण केलं.
संत नामदेवांची आणि गुरू ग्रंथ साहिब
माहितीनुसार, गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांच्या पदाचांही समावेश करण्यात आला आहे. गुरू ग्रंथ साहिबमध्ये संत नामदेवांची तब्बल 61 पदं आहेत. गुरू नानक साहिब यांच्या अगोदर ज्यांची-ज्यांची पदं समाविष्ट करण्यात आली, त्यात सर्वाधिक पदं संत नामदेवांची आहेत. संत नामदेव हे दोन दशकांहून अधिक काळ पंजाबमध्ये राहिले आहेत. संत नामदेवांचं मूळ गाव नरसी नामदेव हे नांदेडपासून जवळच आहे. आजही शीख धर्मिय लोकं नांदेडला आल्यावर नरसी नामदेवला आवर्जून जातात असे म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)