(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Diwali 2022 : दिवाळीचा सण अवघ्या 10 दिवसांवर; भारतातील विविध प्रांतात कशी साजरी करतात दिवाळी? वाचा सविस्तर
Diwali 2022 : 21 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे.
Diwali 2022 : दिवाळी (Diwali 2022) हा एक प्रमुख हिंदू सण आहे. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 21 ऑक्टोबरपासून सुरु होणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या निमित्ताने बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. दिवाळीचा आनंद, उत्साह जरी प्रत्येक भारतीयांच्या मनात सारखा असला तरी मात्र भारतात प्रत्येक प्रांतानुसार दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. याच परंपरा या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राच्या उत्तरेकडील प्रांतांत पौर्णिमेनंतरच्या दिवसापासून पुढचा महिना सुरू होतो. त्यामुळे जेव्हा महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात आश्विन महिन्याचा कृष्ण पक्ष चालू असतो, तेव्हा या प्रांतांत तो कार्तिक महिन्याचा कृष्ण पक्ष असतो.
महाराष्ट्र
महाराष्ट्रात दिवाळीचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. वसुबारसपासून सुरु झालेल्या दिवाळीची सांगता भाऊबीजेच्या दिवशी होते. एकूण पाच दिवासांचा हा सण असतो. यामध्ये नरकचतुर्दशी, दिवाळी पाडवा, लक्ष्मीपूजन आणि धनत्रयोदशी या सणांनाही तितकंच महत्त्व आहे. दिवाळीत घराघरांत लाडू, चकली, चिवडा, करंजी असे फराळ बनवले जातात. घरासमोर दिवे पणती लावली जाते. रांगोळी काढतात. तसेच रंगीत आकाशकंदील लावून फाटके फोडून हा सण साजरा करतात. तसेच, या निमित्ताने घरी पाहुणेदेखील येतात त्यामुळे स्नेह टिकून राहते.
राजस्थान
राजस्थानी लोक दिवाळीचा संबंध राम वनवासातून परत आला, त्या घटनेशी जोडतात. काही ठिकाणी लंकादहनाचा देखावा उभा करून त्यातून शोभेची दारू उडवतात. तर, मांजरीला लक्ष्मी मानून तिचे कौतुक करतात. दिवाळीतल्या चतुर्दशीला 'रूपचौदस' म्हणतात. त्या दिवशी ब्राह्मण आणि वैश्य स्त्रिया सूर्योदयापूर्वी स्नान करून विशेष शृंगार करतात. संध्याकाळी मुली मस्तकावर 'घुड्ल्या' घेऊन घरोघर फिरतात. घुडल्या म्हणजे सच्छिद्र घडा असतो आणि त्यात दिवा लावलेला असतो. अमावास्येला लक्ष्मीपूजन फार थाटाने साजरा करतात. प्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट करतात याला खेंखरा म्हणतात. दुसऱ्या दिवशी राजदरबारी आणि घरोघरी दौतीची तसेच लेखणीची पूजा होते.
पंजाब
पंजाबमधील लोक रामराज्याभिषेकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ दीपोत्सव साजरा करतात. तिथले शीख लोक अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या स्थापनेचा स्मृतीदिन म्हणून हा सण पाळतात. शीखांचे सहावे गुरू हर गोविंद सिंह जी यांची मुघलांच्या कैदेतून या दिवशी सुटका झाल्याने शीख बांधव दिवाळीचा दिवस उत्साहाने साजरा करतात.
हरियाणा
हरियाणामध्ये दिवाळीला दिव्यांची आरास करतात. या ठिकाणी लक्ष्मीपूजनला विशेष महत्त्व दिले जाते.
उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागातील लोक दिवाळीच्या दिवशी गायींची पूजा करतात आणि रात्री गावच्या सीमेवर जाऊन मशालींच्या प्रकाशात नाचतात. काही लोक कुबेराची पूजा करतात, तर काही लोक देवीची पूजा करून तूपभात आणि साखर खातात.
नेपाळ
नेपाळमध्ये दिवाळीच्या दिवसात द्यूतक्रीडेला विशेष महत्त्व आहे. नेपाळी लोक लक्ष्मीपूजन तर करतातच, पण त्याचबरोबर या दिवशी कुत्रे, गायी, बैल यांचीही पूजा करण्याची प्रथा या ठिकाणी प्रचलित आहे.
गोवा
गोव्यातील दिवाळी सामुदायिक आतिथ्याची असते. शेजारी पाजारी एकत्र जमून प्रत्येकाकडे जातात आणि दूधगुळाच्या पोह्यांचा फराळ करतात. गोव्यातील विविध गावांमध्ये आणि शहरी भागांत नरकासुर राक्षसाचे पुतळे तयार करून त्यांचे दहन करण्याची स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. हे दिवाळीचे आकर्षण मानले जाते.
दक्षिण भारत
दक्षिण भारतात या दिवशी सूर्योदयापूर्वी केलेले स्नान गंगास्नानाइतके पवित्र मानले जाते. तमिळनाडूमध्येही काही लोक नरकचतुर्दशीला सूर्योदयापूर्वी दोन वेळा स्नान करतात. आंध्र प्रदेशातील लोक घरासमोर एक मचाण बांधून त्यावर पणत्या लावतात आणि स्त्रिया त्याच्यावर बसून रात्रभर लक्ष्मीच्या स्वागताची गाणी गातात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रेड्यांची झुंज लावतात. आश्विनी अमावास्येला केलेले पितृतर्पण विशेष फलप्रद मानतात.
महत्वाच्या बातम्या :