Health Tips : महागड्या फळांऐवजी 'ही' स्वस्त फळे खरेदी करा; व्हिटॅमिन्ससह मिळतील 'हे' फायदे
Health Benefits Of Fruits : वाढत्या महागाईचा परिणाम भाज्या आणि फळांवर देखील होऊ लागला आहे.
Health Benefits Of Fruits : दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. वाढत्या महागाईचा परिणाम भाज्या (Vegetables) आणि फळांवर (Fruits) देखील होऊ लागला आहे. सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांचे भाव वाढले आहेत. पण, आपण आपल्या मुलांना आवश्यक पोषण दिले पाहिजे. अशा वेळी महागडी फळे घेण्याऐवजी तुम्ही या ऋतूत स्वस्तात मिळणारी फळे विकत घेऊ शकता. यामुळे तुमची बचतही होईल आणि मुलांना महागड्या फळांपेक्षा अधिक पोषण देखील मिळेल. ही फळं नेमकी कोणती आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्ट्रॉबेरी ऐवजी संत्री विकत घ्या
स्ट्रॉबेरीला बाजारात खूप मागणी आहे. त्याप्रमाणे त्याची किंमतही महाग आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी विकत घेणं अनेकदा सर्वसामान्यांना परवडत नाही. पण स्ट्रॉबेरीच्या तुलनेत संत्री स्वस्त आणि पौष्टिक फळ आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि अनेक खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. स्ट्रॉबेरीप्रमाणेच ते अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात.
किवीऐवजी पेरू खरेदी करा
किवी हे महाग फळ आहे. चवीने आणि आरोग्यासाठी जरी किवी चांगली असली तरी महागड्या किंमतीमुळे ती अनेकांना खरेदी करता येत नाही. अशा वेळी तुम्ही किवी ऐवजी पेरू विकत घेऊ शकता. पेरू हे असे स्वस्त फळ आहे ज्यात किवीचे सर्व गुणधर्म आहेत. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, फायबर इ. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात जे आपल्या शरीराचे रोगांपासून संरक्षण करतात.
एवोकॅडो ऐवजी 'हे' फळ विकत घ्या
एवोकॅडो हे अतिशय पौष्टिक फळ मानले जाते. पण, हे फळ महाग असल्या कारणाने अनेकांना ते विकत घेणं परवडत नाही. अशा वेळी तुम्ही एवोकॅडो ऐवजी केळी विकत घेऊ शकता. केळ्यांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6 आणि सी यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.
लाल द्राक्षांऐवजी हिरवी द्राक्षे खरेदी करा
लाल आणि हिरवी अशा दोन्ही द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे असतात जी आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. त्यामुळे पौष्टिकतेच्या बाबतीत लाल आणि हिरव्या द्राक्षांमध्ये फारसा फरक नाही. लाल आणि हिरव्या द्राक्षांमध्ये पोषक घटक जवळजवळ समान असतात. पण लाल द्राक्षे खूप महाग आहेत. त्यापेक्षा हिरवी द्राक्षे स्वस्त आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.