Job Report : कामातून मन उडालं, 5 पैकी 4 जणांना बदलायचीय नोकरी; LinkedIn चा नवा रिपोर्ट
LinkedIn Job Report : 18 ते 24 वयोगटातील तरुणांचा या वर्षी नोकरी बदलायची आहे. सुमारे 88 टक्के लोक असे त्यांच्या सध्याच्या कामावर खूश नाहीत.
LinkedIn Job Report : सुमारे 88 टक्के तरुण त्यांच्या सध्याच्या कामावर नाखूश आहेत, असे एका नव्या अहवालात समोर आलं आहे. 2023 या नवीन वर्षात त्यांना नोकरी बदलायची आहे. लिंक्डइन (LinkedIn) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने 2023 वर्षासाठी नवीन अहवाल जारी केला आहे. या अहवालानुसार, पाच जणांपैकी चार जणांना त्यांच्या सध्याच्या कामातून आनंद मिळत नसून त्यांना नोकरी बदलायची आहे. रिपोर्टनुसार, 18 ते 24 वयोगटातील सुमारे 88 टक्के तरुणांना नवीन वर्षात नोकरी बदलायची आहे. विशेष बाब म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून लहान मोठ्या अनेक कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरु आहे.
5 पैकी 4 जणांना बदलायचीय नोकरी
लिंक्डइनने (LinkedIn) 2023 साठी एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये समोर आलं आहे की अनेक लोक त्यांच्या नोकरीबद्दल खूश नाहीत त्यामुळे 5 पैकी 4 लोक नवीन वर्षात नोकरी बदलण्याची त्यांची इच्छा आहे. अहवालात असेही समोर आले आहे की, 2021 च्या तुलनेत गेल्या महिन्यात म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये भारतात नोकरभरतीमध्ये 23 टक्क्यांनी घट झाली आहे.
संशोधनात ही बाब समोर
30 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत लिंक्डइनने 18 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या दोन हजारांहून अधिक कर्मचार्यांवर संशोधन करुन हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार 18 ते 24 वर्षे वयोगटातील सुमारे 88 टक्के तरुणांना त्यांची नोकरी बदलायची आहे. तर 45 ते 54 वयोगटातील 64 टक्के लोकांनाही नोकरी बदलण्याची इच्छा आहे. म्हणजेच वयस्कर लोकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग 2023 वर्षात नोकरी बदलण्याचा विचारात आहे.
'हे' आहे नोकरी बदलण्याचं कारण
या संशोधनातील सुमारे तीन चतुर्थांश कर्मचाऱ्यांनी सांगितले की, जर त्यांना नोकरी सोडावी लागली तर ते अधिक आत्मविश्वासाने नवीन नोकरीसाठी अर्ज करतील. वाढता खर्च आणि कमी पगार यामुळे कर्मचाऱ्यांना नवीन नोकऱ्या शोधाव्या लागत आहेत. हेच नोकरी बदलण्याचं मूळ कारण आहे. सर्वेक्षणातील जवळपास 35 टक्के लोक आहेत जे जास्त पगाराच्या शोधात आहेत. दुसरीकडे, 33 टक्के लोक आहेत ज्यांना अशा कंपनीत काम करायचे आहे जिथे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन राखता येईल. तसेच सुमारे 32 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास आहे आणि त्यांना अधिक चांगली नोकरी मिळू शकते.
LinkedIn सुरु करणार वर्कशॉप
नोकऱ्यांच्या शोधात असलेल्या तरुणांना मदत करण्यासाठी लिंक्डइन 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान कार्यशाळा (Workshop) आयोजित करणार आहे. या वर्कशॉपमध्ये विविध इंडस्ट्रीतील दिग्गज नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना करिअरशी संबंधित टिप्स देतील. लिंक्डइन लवकरच युजर्ससाठी मोफत शिक्षण अभ्यासक्रमही सुरु करणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या