JOB: आज कल्याणमध्ये सरकारचा महारोजगार मेळावा; 13 हजार 109 पदांवर नोकरीची संधी, थेट मुलाखती अन् भरती
या मेळाव्यात विविध नामांकीत कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात येणार असून या कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेणार आहेत.
Maharashtra Govt Job : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत आज, शनिवारी कल्याण (जि. ठाणे) येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकीत कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात येणार असून या कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेणार आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्घाटन
सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण (पूर्व) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करियर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
नामांकीत उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी
मेळाव्यामध्ये क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड, एएससीआयआय प्रा. लि., स्टेल्थ हेल्थ मॅनेजमेंट, रिलायबल लॅब्स, घार्डा केमिकल्स, हॉकीन्स कुकर्स, पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, आदिश कन्सलटन्सी, इंडो अमाईन्स, रिलायबल एचयूबी इंजिनिअरीग (इंडिया), पितांबरी प्रॉडक्टस्, भारत गिअर्स, सुयश ग्लोबल, सँडस् सिनर्जी, पुरोहीत टेक्सटाईल अँड प्रॉडक्टस्, प्रोमोज इंजिनिअरींग, जेड रबर प्रॉडक्ट, कल्पवृक्ष, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, बीईडब्ल्यू इंजिनिअरींग, मार्करीच ॲप्रल, नेक्सजी ॲप्रल एलएलपी आदी विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नववी, दहावी, ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट, आयटीआय, इंजिरिअरिंग इत्यादी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफीस जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफीसर, सेल्स ऑफीसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारची एकूण 13 हजार 109 रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत.
स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग
मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले आहे.