वर्षभरापूर्वी बाळ झालं, यूट्यूबवर 427K सबस्क्रायबर्स, पण मेंदूच्या आजारानं गाठलं, Red Soil Stories च्या शिरीषच्या जाण्याने हळहळ
YouTuber Shirish Gavas death : यूट्यूबर शिरीष गवस यांचं वयाच्या 33 व्या वर्षी निधन झालंय. त्यामुळे सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

YouTuber Shirish Gavas death : कोकणच्या ग्रामीण जीवनशैलीला सोशल मीडियावर लोकप्रियता मिळवून देणाऱ्या रेड सॉईलचा यूट्यूबर शिरीष गवस यांचं दुर्दैवी निधन झालंय. वयाच्या 33 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. कोकणातील ग्रामीण जीवन अतिशय सुरेख पद्धतीने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणणारे ‘रेड सॉईल स्टोरीज’ हे चॅनेल शिरीषने सुरु केलं होतं. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीच त्याला एक मुलगी झाली होती. मात्र, मेंदूच्या आजाराने गाठलं आणि त्याचा मृत्यू झालाय.
शिरीष गवस यांच्या निधनाच्या सोशल मीडियावरील त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. कोरोना काळात मुंबईतील शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा गवस यांनी एक वेगळेच ध्येय उराशी बाळगून सिंधुदुर्गातील आपल्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. गावातील जीवनशैली, तिथली खाद्यसंस्कृती, लोकांचे दैनंदिन जीवन, त्यात येणारी आव्हाने, गमतीजमती या सर्व घटना गवस दाम्पत्याने युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणल्या.
सिंधुदुर्गातील दोडामार्ग मधील सासोली येथे आपल्या गावात शिरीष गवस काही दिवसांपासून मेंदूंशी निगडित आजाराने त्रस्त होता. त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याच्या दुःखद निधनाची बातमी समोर आली. शिरीष यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
शिरीषच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता. त्यामुळे मागील काही दिवसांपासून त्याच्यावर गोव्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचे निधन झाले. अवघ्या वर्षभरापूर्वीच त्याच्या घरी एका गोंडस मुलीचा जन्म झाला होता. शिरीषच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. आज सकाळी 11 वाजता दोडामार्ग तालुक्यातील सासोली पाट्ये पुनर्वसन भागात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कोरोनाच्या काळात पूजा आणि शिरीषने मुंबईतील आपला निवास सोडून कोकणात स्थलांतर केले. शिरीष मुंबईत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याची पत्नी ही JJ स्कूल ऑफ आर्टची माजी विद्यार्थीनी असून, तिने पुण्यातील एफटीआयमधून प्रॉडक्शन डिझाईनचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर तिने सात वर्षे बॉलिवूडमध्ये आर्ट डायरेक्टर म्हणून काम केले. कोकणात आल्यानंतर त्यांनी गावातलं साधं, मातीचा सुगंध असलेलं जीवन, स्वतःच्या शेतात उगम पावलेलं अन्न, घरासमोरील बाग अशा अनेक गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या.
'रेड सॉइल स्टोरीज' या त्यांच्या यूट्युब चॅनेलवर सुरुवातीला पारंपरिक कोकणी खाद्यसंस्कृतीची माहिती देणाऱ्या रेसिपीज शेअर करण्यात आल्या. नंतर स्थानिक सण-उत्सव, शेती, जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्ती, स्थानिक जीवनशैली आणि परंपरा यांचा सखोल अभ्यास त्यांनी जनतेसमोर मांडायला सुरुवात केली. त्यांनी कधी भातशेती केली, तर कधी पारंपरिक पद्धतीने अन्न शिजवलं. कधी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या आठवणींना नवसंजीवनी दिली.
इतर महत्त्त्वाच्या बातम्या
Red Soil Stories चे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या 33 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
























