(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Video | व्हिसाशिवायच दुबईला पोहोचला बॉलिवूड अभिनेता; पुढं काय झालं पाहाच
कोणत्याही प्रवासाला निघतेवेळी काही आवश्यक गोष्टी सोबत घेतल्या आहेत की नाही, याची खात्री करण्याकडे अनेकांचा कल असतो. किंबहुना कित्येकांना ही सवयच असते.
मुंबई : कोणत्याही प्रवासाला निघतेवेळी काही आवश्यक गोष्टी सोबत घेतल्या आहेत की नाही, याची खात्री करण्याकडे अनेकांचा कल असतो. किंबहुना कित्येकांना ही सवयच असते. पण, याला काही प्रसंग मात्र अपवादही ठरतात. हेच अपवाद नकळतपणे अडचणीही उभ्या करुन जातात. सध्या एका बॉलिवूड अभिनेत्याला काहीशा अशाच परिस्थितीचा, नव्हे तर अडचणीचा सामना करावा लागला.
दुबई रोखानं अभिनेत्यानं प्रवास सुरु केला खरा, पण तिथं पोहोचल्यावर आपल्याकडे व्हिसाची मुळ प्रत नसल्याचं त्याच्या लक्षात आलं. दुबईमध्ये जाऊन आपल्याकडून एक मोठी चूक झाल्याचं लक्षात आलेला हा अभिनेता आहे, विवेक ओबेरॉय. खुद्द विवेकनंच सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत याबाबतची माहिती दिली. त्याची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये मात्र काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर याबाबतची माहिती देत, विवेक म्हणाला 'मी इथं या सुरेख अशा ठिकाणी, दुबईमध्ये आहे. काही कामासाठी मी इथं आलो आहे. पण, माझ्यासोबत इथं एक अनपेक्षित घटना घडली. त्यामुळं तुम्हालाही त्याची माहिती द्यावी असं मला वाटलं. मी दुबईमध्ये आलो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे व्हिसाची मूळ प्रत नाही. म्हणजे व्हिसा आहे पण, त्याची प्रत मी सोबत आणली नाही. फोनवरही त्याची डिजिटल कॉपी नाही.'
View this post on Instagram
व्हिसा नसल्याचं म्हणताच चाहत्यांमध्ये चिंता...
आपल्याकडे व्हिसा नाही, असं तेव्हा विवेकनं सांगितलं तेव्हा काही चाहत्यांनी विवेकप्रती चिंता व्यक्त केली. परराष्ट्रांतील नियम आणि सध्याची परिस्थिती पाहता ही चिंता वाटणं स्वाभाविक होतं. पण, विवेकनं मात्र ही परिस्थिती अगदी सहजपणे निभावून नेली. दुबई हे सक्तीच्या नियमांसाठी ओळखलं जाणारं ठिकाण आहे. पण, इथं अधिकाऱ्यांनी आपल्याला पूर्णपणे सहकार्य केल्याचा आनंद विवेकनं त्याच्या व्हिडीओमधून व्यक्त केला. सोबतच आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचेच त्यानं आभार मानले.
प्रवासाला निघालं असता अशा घटना सहसा घडतात. पण, या प्रसंगी गोंधळून न जाता संबंधित अधिकारी आणि यंत्रणांचं सहकार्यही वेळीच मिळतं आणि मोठ्या वाटणाऱ्या अडचणी कधी नाहीशा होतात हेच कळत नाही, हे विवेकच्या या अनुभवातून स्पष्ट होत आहे.