World Mime Day: शब्दांविना होणारे नाट्य
22 मार्च हा दिवस 'जागतिक माईम दिवस' म्हणून ओळखला जातो. फक्त चेहऱ्यावरच्या हावभावाच्या माध्यमातून एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची कला म्हणजे 'माईम' हा नाट्यप्रकार.
World Mime Day: आपल्या भावना, विचार, संवेदना व्यक्त करण्याचं सगळ्यात प्रभावी आणि जास्तीत जास्त वापरलं जाणारं माध्यम म्हणजे 'शब्द' असं मानलं जातं. फक्त चेहऱ्यावरच्या हावभावाच्या माध्यमातून एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्याची कला म्हणजे 'माईम' हा नाट्यप्रकार. एखादी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त शब्दांचाच वापर केला जातो असं नाही तर ती गोष्ट हावभावांनी आणि हालचालींनी प्रभावीपणे पोहोचवली जाऊ शकते. याच कलेला 'माइम' किंवा 'मूकनाट्य' असं म्हटलं जातं.
माणूस आणि विचार यांच्यातील संवाद पार पाडण्यासाठी शांतता हाच एकमेव दुवा आहे, असे जगप्रसिद्ध मूकनाट्य कलाकार मार्शल मार्शो यांनी म्हटले आहे. माईम हा अभिनयाचा पहिला पाया असतो. कलेच्या माध्यमातून विकास साधण्याची भारतीय रंगभूमीची जूनी परंपरा आहे. यामध्ये गीत, नृत्य, नाट्य अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. परंतु मूकनाट्य मात्र काहीसे दुर्लक्षितच झालेले दिसते. माइमद्वारे शारिरीक आणि मानसिक विकास मोठ्या प्रमाणात साधता येतो.
मूकनाट्य म्हणजे 'न बोलता साधला जाणारा संवाद' अशी सर्वसाधारण व्याख्या करण्यात येते. मूकनाट्य म्हणजे फार काही ग्रेट नसून आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण ती क्रिया करत असतो. फरक फक्त इतकाच असतो की, एखादी कथा मूकनाट्य रुपात आणण्यासाठी आणि प्रेक्षकांना शब्दांविना कळण्यासाठी तिची योग्यरितीने बांधणी करण्यात येत असते. एखाद्या सोबत फोनवर बोलत असताना अचानक दुसरी व्यक्ती समोर आल्यावर इशारे आणि हातवारे करत जो संवाद साधला जातो तो म्हणजेच 'माईम', फक्त कला म्हणून तिचा फारसा विकास झालेला नाही. चार्ली चॅपलीनने ही कला निर्माण केल्याचे म्हटले जाते. परंतु या कलेचे मूळ भारतात असल्याचे फारसे कुणाला माहित नाही. भारतीय कथ्थक, भरतनाट्यम या नृत्यप्रकारांत मूकाभिनय करावा लागतो.
स्ट्रीट माइम म्हणजे काय?
उपलब्ध जागेचा वापर करूण केवळ हातवारे आणि हावभावांतून संदेश लोकंपर्यंत पोहोचवण्याला 'स्ट्रीट माईम' असे म्हणतात.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा माईम स्पर्धेचे आयोजन नाही.
मुंबई विद्यापीठ दरवर्षी यूवा महोत्सवाचं आयोजन करत असतं. त्यातच माईमची स्पर्धादेखील भरवण्यात येते. यात मुंबई विद्यापीठ संलग्न असलेले महाविद्यालयं सहभागी होतात. परंतु यंदा मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माईमच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नाही. परंतु विविध महाविद्यालयांतील महोत्सवांत ऑनलाईन पद्धतीने माईमच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.