(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Paach Futacha Bacchan: सुपरस्टार तिथं पण असतात आणि इथं पण...; पुण्यात रंगणार 'पाच फुटाचा बच्चन' च्या शुभारंभाचा प्रयोग
‘पाच फुटाचा बच्चन’ (Paach Futacha Bacchan) या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाटयसभागृहात 5 फेब्रुवारीला रविवारी रात्री 9 वाजता पार पडणार आहे.
Paach Futacha Bacchan: कोरोना काळानंतर मराठी रंगभूमी थंडावली होती. पण आता नवी नाटकं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. 5 फेब्रुवारी 2023 रोजी आणखी एक नवे नाटक मराठी रंगभूमीवर येते आहे. रोम रोम रंगमंच आणि ऑर्फियस स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाच फुटाचा बच्चन’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यसभागृहात 5 फेब्रुवारीला रविवारी रात्री 9 वाजता पार पडणार आहे. ऑर्फियस स्टुडिओच्या माध्यमातून फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स आणि जाहिरात क्षेत्रात सर्जक काम करणाऱ्या मूळच्या कोल्हापूरच्या कौस्तुभ रमेश देशपांडेने हे नाटक लिहिले आहेत तसेच श्रुती मधुदीपनं हे नाटक दिग्दर्शित केले आहे. श्रुती मधुदीप या नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.
गावखेड्यातून आलेल्या सुपरस्टारची गोष्ट
‘पाच फुटाचा बच्चन’ हे नाटक म्हणजे एका गावखेडयातून आलेल्या सुपरस्टारची गोष्ट आहे. एका सामान्य,कष्टकरी कुटुंबातून मोठी होत, आपल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत आपल्या क्षेत्रात स्टार होणाऱ्या मुलीची ही कहाणी आहे. तिच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक वादळ तिच्या स्टारडमला आणि तिच्या मूलभूत धारणांना धक्का देत येते आणि मग जे घडते ते प्रत्यक्ष रंगमंचावर पाहताना सुजाण प्रेक्षक हसता हसता अंतर्मुख होतो. श्रुती मधुदीपनं काही दिवसांपूर्वी या नाटकाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होते. या पोस्टरला त्यांनी कॅप्शन दिलं, 'सुपरस्टार तिथं पण असतात आणि इथं पण...'
View this post on Instagram
प्रत्येक समाजाचा एक सांस्कृतिक वारसा असतो. विविध कलाप्रकारांच्या माध्यमातून समाज हा सांस्कृतिक वारसा जोपासत असतो. बदलणारा काळ, आधुनिकता यामुळे समाजाच्या मूळ सांस्कृतिक वारसा बदलत जातो आणि समाजाने काळजाशी घट्ट जपलेले हे कलाप्रकार नव्या प्रकारे अभिव्यक्त होऊ लागतात. असे होताना अनेकदा त्यांचा मूळ आशय देखील हरवण्याची शक्यता असते, नव्हे तो अनेकदा हरवतो देखील.
संस्कृती, पारंपारिकता आणि आधुनिकता याच्या विचित्र कोंडीत प्रत्येक क्षेत्रातील निर्मितीशील व्यक्ती अडकलेली असते. अशा वेळी आयुष्यात आलेला एखादा साक्षात्कारी क्षण आपल्याला सांस्कृतिक संचिताचे नेमके भान देतो, मुळांची जाणीव करुन देतो. 'पाच फुटाचा बच्चन' हे नाटक हा गावखेड्याच्या मातीतील हा सांस्कृतिक संघर्ष नेमकेपणाने दाखवते. हरवू पाहणारी मूल्ये गवसण्याची शक्यता वाढत जाते. आजूबाजूच्या परिस्थितीशी, तरुण पिढीच्या मूल्य संघर्षाशी हे नाटक, त्याची कथा रिलेट होते आणि म्हणून त्याचे सादरीकरण महत्त्वाचे आहे.
अभिनव जेऊरकर ( सहायक दिग्दर्शक), मयूर देशमुख (निर्मिती प्रमुख) , निरंजन पेडगावकर (संगीत आणि ध्वनी संयोजन) , विक्रांत ठकार ( प्रकाशयोजना ), आशिष हेमंत देशपांडे (रंगभूषा आणि वेशभूषा), स्वप्नील कर्णावट (नेपथ्य), मयूर प्रकाश कुलकर्णी (प्रसिध्दी डिझाईन) रोम रोम रंगमंचची अशी अनुभवी, तगडी टीम हे नवे नाटक घेऊन येते आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Ghoda : एक घोडदौड... जगण्याची... संघर्षाची... स्वप्नांची...! कैलास वाघमारेच्या 'घोडा'चं पोस्टर आऊट