Amar Photo Studio : 'अमर फोटो स्टुडिओ' नाटक घेणार प्रेक्षकांचा निरोप; सुनील बर्वेची भावूक पोस्ट
Amar Photo Studio : 'अमर फोटो स्टुडिओ' या लोकप्रिय नाटकाने आता प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.
Amar Photo Studio : 'अमर फोटो स्टुडिओ' (Amar Photo Studio) हे मराठी नाट्यसृष्टीतील लोकप्रिय नाटक आहे. आता हे रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'अमर फोटो स्टुडीओ' हे आजच्या तरुणाईने तरुणांसाठी केलेलं एक चिरतरुण नाटक आहे. आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने सुनील बर्वेने एक भावूक पोस्ट लिहिली आहे.
सुनील बर्वेने (Sunil Barve) लिहिलं आहे,"काल 'अमर फोटो स्टुडिओ' या आमच्या नाटकाचा बोरिवलीतील शेवटचा प्रयोग होता. तसाच तो पर्ण पेठेचादेखील शेवटचा प्रयोग होता. सखी परदेशी शिकायला गेल्यानंतर पर्ण प्रयोग करायला लागली. सखी परत आल्यावर दोघी आलटून पालटून प्रयोग करत राहिल्या. नंतर आठ-नऊ महिने या नाटकाचे प्रयोग झाले नाहीत. दरम्यान पर्णने 'चारचौघी' नाटक घेतलं आणि ते धुंवाधार चालू लागलं".
नाटकाच्या टीमने दिला पर्णला आगळावेगळा निरोप
सुनीलने पुढे लिहिलं आहे,"अमर फोटो स्टुडिओ'चे शेवटचे काही प्रयोग करायचे ठरवल्यानंतर तिला प्रयोग करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे आम्हा सर्वांनाच वाईट वाटत होतं. पण कालचा प्रयोग करणं तिला शक्य झालं आणि तो तिचा 'अमर फोटो स्टुडिओ'चा शेवटचा प्रयोग ठरला. सखी ऐवजी ती प्रयोग करण्याचं ठरलं तेव्हासुद्धा आम्ही तिचं स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतिने केलं. म्हणूनच तिच्या शेवटच्या प्रयोगालादेखील आगळेवेगळेपणा टिकवून ठेवला".
View this post on Instagram
सुनीलने लिहिलंय,"पर्ण, काल तू आम्हा सगळ्यांचे आभार मानलेस, तेव्हा भरुन आलं होतं. पण मी सुबक आणि कलाकारखानाच्या टीमच्या वतीने तुझे आभार मानतो. सखी परदेशी जाण्याचा विचार करत होती. तेव्हा 'अमर फोटो स्टुडिओ' ऐन बहरात होतं. ते पुढे कसं न्यायचं हा आमच्या समोरचा प्रश्न तू सोडवलास आणि प्रयोगांची घोडदौड देशात-परदेशातही तशीच चालू ठेवलीस, तू एक उत्तम कलाकार आहेसच. पण एक सहृदयी माणूस सुद्धा आहेस हे जाणवलं. तुझ्या पुढील वाटचालीसाठी अमरच्या संपूर्ण टीमकडून अनेक शुभेच्छा".
'अमर फोटो स्टुडिओ' या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकात अमेय वाघ, सखी गोखले, पर्ण पेठे, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे आणि साईनाथ गणुवाड हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या नाटकाची निर्मिती सुनील बर्वेने केली असून मनस्विनीने हे नाटक लिहिलं आहे. तर निपुण धर्माधिकारीने या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे.
संबंधित बातम्या