(Source: ECI/ABP News/ABP Majha)
34 कोटींचं बजेट अन् 486 कोटींची कमाई, सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटातील फक्त 16 मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार
The Silence of the Lambs : 34 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाने 486 कोटींची कमाई आणि अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला.
Box Office Collection : जगभरात बॉक्स ऑफिसवर दर आठवड्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शैलीतील चित्रपट प्रदर्शित होत असतात. काही चित्रपट बिग बजेट असतात, तर काही चित्रपट कमी बजेटमध्ये बनतात. बिग बजेट चित्रपट कधी चांगली कमाई करुन देतात, तर कधी-कधी बॉक्स ऑफिसवर चांगलेच आदळतात. याउलट कधी-कधी कमी बजेटमध्ये तयार झालेले चित्रपट कोट्यवधींचा गल्ला जमवतात. अशाच एका चित्रपटाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
34 कोटींचं बजेट अन् 486 कोटींची कमाई
34 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या एका सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटाने 486 कोटींची कमाई आणि या चित्रपटासाठी अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात खळबळ उडवून दिली होती. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय आणि सस्पेंसने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं, त्यामुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाची कथा खूप छान आहे. या चित्रपटाच्या कथेमुळेच हा चित्रपट सुपरहिट ठरण्यासोबत याची अविस्मरणीय ठरला.
चित्रपटातील दमदार अभिनयासाठी अभिनेत्याला ऑस्कर
हा चित्रपट 1991 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. कमी बजेटमध्ये तयार होऊन कोट्यवधी कमवणाऱ्या या चित्रपटाचं नाव 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' (The Silence of the Lambs) असं आहे. हा एक सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे, ज्याची कथा पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स हा हॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. हा चित्रपट उत्कृष्ट कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
केवळ 16 मिनिटांच्या भूमिकेसाठी ऑस्कर पुरस्कार
या चित्रपटात साकारलेल्या फक्त 16 मिनिटांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार मिळवून दिला होता. 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपटात अँथनी हॉपकिन्स (Anthony Hopkins) यांनी 'हॅनिबल लेक्टर'ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात अँथनी हॉपकिन्स यांनी फक्त 16 मिनिटांची भूमिका साकारली होती, पण त्याच्या दमदार वास्तववादी अभिनयामुळे त्यांनी या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकला.
या चित्रपटात अभिनेत्री जोडी फॉस्टर (Jodie Foster) फॉरेन्सिक सायकोलॉजिस्टच्या भूमिकेत दिसल्या होत्या. फॉरेन्सिक सायकोलॉजिस्टच्या भूमिकेसाठी जोडी फॉस्टर (Jodie Foster) यांनी अनेक एफबीआय अकेडमीचीही मदत घेतली. 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' या चित्रपटाचं दिग्दर्शन जोनाथन डेमे यांनी केलं होतं. त्यांच्यासाठी हा चित्रपट खूप खास होता. कारण हा चित्रपट एक सस्पेन्स-थ्रिलर होता. मात्र, दिग्दर्शक जोनाथन कॉमेडी आणि म्युझिक डॉक्युमेंटरी चित्रपटांसाठी ओळखले जायचे.
चित्रपटाला पाच ऑस्कर पुरस्कार
1992 मध्ये 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपटाने पाच ऑस्कर पुरस्कार जिंकले. या चित्रपटाला सर्व प्रमुख श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (अँथनी हॉपकिन्स), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (जोडी फॉस्टर), सर्वोत्कृष्ट रुपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट चित्र आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (जोनाथन डेमे) यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.
बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन
'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपट जोनाथन डेमे दिग्दर्शित एक मानसशास्त्रीय सस्पेंस-थ्रिलर चित्रपट आहे. 'द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्स' चित्रपटाचं बजेट फक्त 34 कोटी रुपये होते आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 33 वर्षांपूर्वी केवळ 34 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 486 कोटींची दमदार कमाई केली होती.