ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला, देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचणारा 'किमयागार' हरपला
सॅटेलाइट टीव्हीच्या (Satellite TV India origin) माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे.

Eknath Vasant Chitnis: भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणारे (Indian space pioneer) डॉ. विक्रम साराभाई यांचे सहकारी (Vikram Sarabhai associate) व कोल्हापुरात जन्मलेले डॉ. एकनाथ वसंत चिटणीस (Eknath Vasant Chitnis) यांचे आज (22 ऑक्टोबर) सकाळी वयाच्या 101 व्या वर्षी निधन झाले. डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णय मुलाखतीनंतर डॉ. चिटणीस यांनी घेतला होता. श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती. देशाच्या खेडोपाड्यात टीव्ही पोहोचणारा किमयागार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. वसंत चिटणीस यांच्या निधनाने भारतीय अवकाश संशोधनाच्या सुवर्ण इतिहासात आज एक पान काळाच्या पडद्याआड गेलं आहे. भारताच्या अवकाश प्रवासाचे शिल्पकार, विक्रम साराभाईंचे निकटचे सहकारी आणि सॅटेलाइट टीव्हीच्या (Satellite TV India origin) माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे. 26 जुलैला त्यांनी आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे केले होते.
वसंत चिटणीस यांचा कोल्हापुरात जन्म
1925 मध्ये कोल्हापूरमध्ये जन्मलेले प्रा. चिटणीस हे लहान वयातच अनाथ झाले, पण आजी आणि कुटुंबियांच्या संस्कारांनी आणि आजोबा मल्हार खंडेराव चिटणीस यांच्या “वंडर्स ऑफ स्पेस” या मराठी ग्रंथाने त्यांच्या अंतरिक्षप्रेमाला दिशा दिली. पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्रात प्रथम श्रेणीत पदवी घेतल्यानंतर त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये आकर्षक सरकारी नोकरी नाकारून विज्ञानाचा मार्ग निवडला.
Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाने स्वप्न साकार
1950 मध्ये पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विक्रम साराभाईंचे प्रेरणादायी भाषण ऐकून त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (PRL) मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. 1961 मध्ये साराभाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारली आणि थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1963 मध्ये भारताच्या पहिल्या Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाने त्यांचे स्वप्न साकार झाले.
सहा राज्यांतील 2,400 गावांपर्यंत शिक्षण पोहोचले
वसंत चिटणीस यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे 1975-76 मधील सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE) ज्याद्वारे नासाच्या उपग्रहाच्या साहाय्याने सहा राज्यांतील 2,400 गावांपर्यंत शिक्षण पोहोचले. “उपग्रह म्हणजे आकाशातील शिक्षकच ठरला,” असं ते नम्रतेने म्हणायचे. याच प्रयोगातून पुढे INSAT प्रणालीचा पाया रचला गेला आणि भारताच्या डिजिटल युगाची बीजे रुजली. नंतर ते इस्रोच्या Space Applications Centreचे संचालक झाले. निवृत्तीनंतर त्यांनी पुणे विद्यापीठात 25 वर्षे अध्यापन केले. 1985 मध्ये त्यांना पद्मभूषण सन्मान मिळाला. त्यांचा पुत्र डॉ. चेतन चिटणीस यांनाही यंदा पद्मश्री मिळाला आहे. एक दुर्मीळ पिता-पुत्र सन्मानाची परंपरा या निमित्ताने झाली.
अन् अब्दुल कलाम यांना जबाबदारी मिळाली
19962 मध्ये नासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि INCOSPAR 10 तरुण शास्त्रज्ञांना प्रशिक्षणासाठी पाठवू इच्छित होते. केंब्रिजमध्ये चिटणीस यांचे एक सहकारी साराभाईंना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा समावेश करण्याची विनंती करत होते आणि तेव्हाच INCOSPAR चे अध्यक्ष विक्रम साराभाई यांनी डॉ. एकनाथ चिटनीस यांना यंग कलाम यांच्या शैक्षणिक पात्रतेचा अभ्यास करण्यास सांगितले.
एकनाथ चिटणीस यांनी अब्दुल कलाम यांचा बायोडाटा वाचला
एकनाथ चिटणीस यांनी प्रथम एपीजे अब्दुल कलाम यांचा बायोडाटा वाचला आणि त्यांच्या शैक्षणिक कामगिरीने आणि सामान्य पार्श्वभूमीने प्रभावित होऊन, विक्रम साराभाई अध्यक्ष असलेल्या भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीचे (INCOSPAR) तत्कालीन सदस्य सचिव एकनाथ चिटणीस यांनी वैयक्तिकरित्या कलाम यांचे नाव प्रशिक्षण कार्यक्रमात समाविष्ट करण्याची शिफारस केली. अशा प्रकारे तरुण कलाम यांची निवड झाली आणि त्यांना नासा येथे पाठवण्यात आले.
पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV) प्रकल्प संचालकपद
1962 मध्ये, डॉ. चिटणीस थुंबा येथून एक्स-रे खगोलशास्त्र प्रयोग करत होते, म्हणून त्या काळात नाकाचा गाभा उघडण्याचे काम एपीजे अब्दुल कलाम यांना सोपवण्यात आले आणि त्यांनी ते काम उत्तम प्रकारे केले. अशा प्रकारे चिटणीस तरुण कलाम यांना चांगल्या प्रकारे ओळखू लागले आणि इस्रोमध्ये तरुण कलाम यांची शिफारस करण्याची त्यांची निवड योग्य होती याचा त्यांना आनंद झाला. डॉ. अब्दुल कलाम यांनी अंतराळ संशोधन कार्यक्रमात इतक्या प्रकारे योगदान दिले की साराभाईंनी स्वतः त्यांना पहिल्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचे (SLV) प्रकल्प संचालकपद दिले.
राष्ट्रपती भवनात एका प्रतिष्ठित व्यक्तीशी संवाद साधताना त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना मलेरियावर कोणीही संशोधन करत नसल्याचे सांगितले होते. एकनाथ चिटणीस यांचा मुलगा आधीच मलेरिया संशोधनावर काम करत असल्याचे त्यांना सांगण्यात आले तेव्हा कलाम यांनी क्षणाचाही विलंब न लावता चिटणीस यांच्या मुलाला राष्ट्रपती भवनात बोलावले आणि मलेरियाबद्दल सर्व काही जाणून घेतले.



















