Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर
Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
![Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर Sudha Murty will appear on the stage of Kon Honar Crorepati Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/14/b861015a8a574c3d6237edefc3227108_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kon Honar Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. 'कौन बनेगा करोडपती'नंतर 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर दुसऱ्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची कन्या पद्मश्री सुधा मूर्ती (Sudha Murty) सहभागी होणार आहेत.
मागच्या आठवड्यात सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू झाले. पहिल्या आठवड्यात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि काजोल विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर या आठवड्यात ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती उपस्थित राहणार आहेत. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाला 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे.
'साधी राहणी, उच्च विचार' ही उक्ती तंतोतंत पाळणाऱ्या सुधा मूर्ती 'कोण होणार करोडपती'च्या खेळात येत्या शनिवारच्या भागात सहभागी होणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातील शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
View this post on Instagram
सुधा मूर्ती या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील 'श्रीदेवी पावणा देवी कृपा शिक्षण विकास मंडळ' या शाळेसाठी खेळल्या. शालेय शिक्षणाबद्दल असलेल्या आस्थेपोटी सुधा मूर्ती 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळल्या. मूळच्या 'कुलकर्णी' असलेल्या सुधा मूर्तींचे बालपण कुरुंदवाड येथे गेले. त्यांचे इयत्ता तिसरीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. त्यामुळे मराठी मातीशी घट्ट नाळ जोडलेली असल्याने सुधा मूर्ती यांना महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती यांबद्दल प्रचंड आदर आणि प्रेम आहे.
'कोण होणार करोडपती' या खेळासाठी सुधा मूर्ती यांनी खास छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातून भेट म्हणून मिळालेली, राजमातांनी दिलेली साडी परिधान केली आहे. लहानपणीच्या आठवणी, संस्कार, एकटी मुलगी म्हणून इंजिनिअरिंग करताना आलेले अनुभव, टाटा यांच्याबरोबर काम करत असतानाचा समृद्ध अनुभव अशा विविधांगी रंजक गोष्टींनी हा विशेष भाग रंगणार आहे. सुधा मूर्ती या प्रस्थापित असून त्यांनी केलेले विस्थापितांसाठींचे कार्य गौरवास्पद आहे. पती नारायण मूर्ती यांच्याबरोबर 'इन्फोसिस फाउंडेशन'ची धुरा पद्मश्री सुधा मूर्ती यांनी सक्षमपणे सांभाळली आहे. समाजकार्यासाठी वाहून घेतलेल्या सुधा मूर्ती यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे.
कधी पाहायला मिळणार? 18 जून
कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप
संबंधित बातम्या
Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती' 6 जूनपासून होणार सुरू; रंगणार ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!
Kajol : 'मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं नव्हतं'; 'कोण होणार करोडपती' कार्यक्रमात काजोलनं सांगितले किस्से
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)