Marathi Serial : 'उदे गं अंबे :कथा साडे तीन शक्तिपीठांची' टीमने देवीला घातलं साकडं, मालिकेच्या सेटवर गोंधळाचं आयोजन
Marathi Serial : 'उदे गं अंबे :कथा साडे तीन शक्तिपीठांची' मालिकेच्या सेटवर देवीआईचा गोंधळ घालण्यात आला आहे.
Marathi Serial : 'विठुमाऊली' आणि 'दख्खनचा राजा' जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे... कथा साडेतीन शक्तिपीठांची’ घेऊन आले आहेत. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही.
तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबरपासून ही मालिका सायंकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कोणत्याही शुभकार्याच्या प्रसंगी देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. याचनिमित्ताने मालिका सुरु होण्याआधी सेटवर देवीच्या गोंधळाचं आयोजन करण्यात आलं होतं.
सतीश राजवाडेंनी काय म्हटलं?
या महामालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे यांनी म्हटलं की, ‘साडे तीन शक्तिपीठे आपली श्रद्धास्थानं आहेत. ही फक्त देवी नाही तर आई आहे सगळ्यांची. अश्या देवी आईची कथा सादर करताना कृतज्ञता वाटतेय. मोठी जबाबदारी आहे. तिन्हीसांजेला देवी आई घरात येईल आणि संपूर्ण महाराष्ट्राला आशीर्वाद देईल. नव्या पीढीला या शक्तिपीठांची माहिती मिळेल आणि घरबसल्या भक्तांना एका यात्रेचा अनुभव मिळेल. आपली परंपरा जोपासण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा नेहमीच प्रयत्न असतो. ही मालिकाही अशीच संस्कार मूल्य आणि करमणुकीची सांगड बांधून सादर केली जाईल.’
10 वर्षांनी देवदत्त नागेचं कमबॅक
साडेतीन शक्तिपीठांचा महिमा जाणून घेण्यासाठी मुळात त्यांची निर्मिती कशी झाली हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी शक्तीरुप असलेल्या देवी सती आणि शिवशंकराच्या कथेपासून या मालिकेची सुरुवात झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे या मालिकेत भगवान शिवशंकर साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास 10 वर्षांनंतर तो स्टार प्रवाहच्या मालिकेत झळकणार आहे.उदे गं अंबे कथा साडेतीन शक्तीपीठांची या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना देवदत्त नागेने म्हटलं की, ‘टीव्ही माझं अत्यंत आवडीचं माध्यम आहे. कारण टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांच्या फक्त घरात नाही तर मनात देखिल पोहोचता. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेने मला अभिनेता म्हणून ओळख दिली. जवळपास १० वर्षांनंतर मी पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतोय. प्रेक्षकांपर्यंत मालिकेच्या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांची गोष्ट पोहोचवण्याची संधी मिळत आहे हे मी माझं भाग्य समजतो.
स्टार प्रवाह प्रस्तुत या भव्यदिव्य मालिकेची निर्मिती महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेने केली आहे. याप्रसंगी महेश कोठारे म्हणाले, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुने ऋणानुबंध आहेत. मन उधाण वाऱ्याचे ही पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर विठुमाऊली, दख्खनचा राजा जोतिबा, पिंकीचा विजय असो, सुख म्हणजे नक्की काय असतं अश्या सुपरहिट मालिका केल्या. उदे गं अबे...कथा साडेतीन शक्तिपीठांची या महामालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचा महिमा उलगडण्यात येणार आहे. ही मालिकाही भव्यदिव्य असेल यात शंका नाही.’
ही बातमी वाचा :
Aai Tuljabhavani : उदे गं अंबे... आई तुळजाभवानी देवीचं हुबेहुब रुप साकारण्याचा प्रयत्न