(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Premachi Goshta : तेजश्री प्रधानच्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत संजीवनी जाधव साकारणार कोळी व्यक्तिरेखा
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत अभिनेत्री संजीवनी जाधव कोळी व्यक्तिरेखा साकारणार आहे.
Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून प्रेक्षकांना आता मालिकेची उत्सुकता आहे. तेजश्री प्रधानच्या (Tejashree Pradhan) या मालिकेत अभिनेत्री संजीवनी जाधव (Sanjeevani Jadhav) कोळी व्यक्तीरेखा साकारणार आहे.
'प्रेमाची गोष्ट' ही मालिका 4 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून नातेसंबंधांवर भाष्य केलं जाणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका देखील नात्यांची गुंफण असेल. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर,तरल कथा म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका आहे.
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत सागर म्हणजेच राज हंचनाळेच्या आईची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री संजीवनी जाधव. नाटक आणि मालिकांच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. प्रेमाची गोष्ट मालिकेतील त्या साकारत असलेली भूमिका नक्कीच वेगळी आहे.
View this post on Instagram
प्रेमाची गोष्ट मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना संजीवनी जाधव म्हणाल्या,"प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मी इंद्रा कोळी ही व्यक्तिरेखा साकारते आहे. कोळी व्यक्तिरेखा साकारायला मला प्रचंड आवडतं. कोळी पेहराव, त्यांची जीवनशैली माझ्या अतिशय आवडीची आहे. या मालिकेतही माझ्या पेहरावावर विशेष मेहनत घेतली गेलीय. पारंपरिक कोळी पद्धतीची साडी, दागिने हे इंद्राचं व्यक्तिमत्व आणखी खुलवतात".
संजीवनी जाधव पुढे म्हणाल्या,"इंद्रा ही आक्रमक विचारांची असली तरी मनाने अतिशय हळवी आहे. तिचं तिच्या मुलावर आणि नातीवर प्रचंड प्रेम आहे. इंद्रा हे पात्र मी फक्त साकारत नाहीय तर ते जगते आहे. मालिकेची टीम खूपच छान आहे. एकवीरा देवीच्या आशीर्वादाने आणि तुम्हा प्रेक्षकांच्या साथीने या मालिकेला भरभरुन यश मिळो ही प्रार्थना".
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचा प्रोमो पाहून ही मालिका 'ये है मोहेब्बतें' या हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेमुळे 'रंग माझा वेगळा' ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या