Premachi Goshta Latest Episode : लकीने चुगली करून वचपा काढला! सागर-मुक्तामध्ये वितुष्ट येणार?
Premachi Goshta Latest Episode : लकीने केलेल्या चुगलीने मुक्ताची कोंडी होणार आहे. तर, दुसरीकडे सावनीने टाकलेल्या जाळ्यात सागर अलगदपणे सापडला असून आदित्यच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला आहे.
Premachi Goshta Latest Episode : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज वेगळे वळण येणार आहे. मुक्ताच्या विरोधात आता घरातील मंडळी जाणार आहेत. मुक्ताविरोधात असलेला राग काढण्यासाठी लकी आता चुगली करणार आहे. लकीने केलेल्या चुगलीने मुक्ताची कोंडी होणार आहे. तर, दुसरीकडे सावनीने टाकलेल्या जाळ्यात सागर अलगदपणे सापडला असून आदित्यच्या मनात त्याच्याबद्दल राग निर्माण झाला आहे. लकीमुळे मुक्ता आणि सागरमध्ये वितुष्ट येणार का, सावनीने टाकलेल्या डावाने सागर बॅकफूटला जाणार का हे प्रेक्षकांना आज समजेल.
आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?
सावनीच्या जाळ्यात सागर अडकला...
सावनी ही आदित्यच्या मनात सागरविरोधात पुन्हा द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करते. सावनी सागरला डिवचण्यासाठी त्याला फोन करते पण हा फोन लाउडस्पीकरवर ठेवते. सावनीला प्रत्युत्तर देताना सागर हा सावनीला सडतोडपणे बोलतो. लाउडस्पीकरवर ऐकत असलेला आदित्य हे ऐकून चिडून सागरवर ओरडतो. माझ्या आईला तुम्ही किती त्रास देताय, मी या सगळ्या त्रासाचा बदला घेणार असल्याचे आदित्य सागरला ठणकावतो. सावनीने टाकलेल्या जाळ्यात आदित्य आणि सागर अडकले जातात.
आदित्यचे बोलणं ऐकून सागर चिंतेत पडतो. आपला मुलगा पुन्हा आपल्यापासून आणखी दुरावणार या चिंतेने सागर हळवा होतो. माझी कोणतीही चूक नसताना माझ्यापासून दूर जातोय हे सागर मुक्ताला सांगतो. मुक्ता सागरला धीर देताना आदित्यला सगळं काही समजेल असे सांगते.
लकीने मुक्ताविरोधात घरात काडी टाकली
माधवीच्या घरात आदित्य येत असल्याचे लकीला माहिती होते. माधवी-मुक्ताचे बोलणं ऐकून आता कधी काडी टाकायची असा विचार लकी करतो. घरात मुक्ताविरोधात बोलण्यासाठी लकी संधीच्या शोधात असतो आणि ती संधी त्याला मिळते.
तर, दुसरीकडे लकीच्या आवडीची भाजी न केल्याने इंद्रा संतापली आहे. बापू आणि सागर मुक्ताची बाजू घेत असल्याने इंद्राची आणखी चिडचिड होते. सागरच्या फोन कॉलनंतर लकी घरी जेवायला येतो. सागर त्याला जेवण्यास सांगतो. त्यावेळी लकी मला भाजी आवडत नाही, मी जेवणार नाही असे सांगतो. सागर मुक्ताची बाजू घेतो. हे पाहून लकी सागरला मुक्तावर एवढा विश्वास ठेवतो का असे विचारतो. त्यावर सागर होकारार्थी उत्तर देतो. त्यावर लकी आदित्य हा मुक्ताच्या माहेरी माधवीकडे येतो हे आपल्यापासून का लपवले असे विचारतो. लकीच्या गौप्यस्फोटाने सागरला धक्का बसतो. मुक्ता वहिनीने ही गोष्ट आपल्यापासून का लपवली हे वहिनीने सांगावे असे लकी सांगतो.
आदित्यच्या नावाने आधीच हळवा असणारा सागर हा मुक्ताला जाब विचारतो. लकी खरं बोलतोय का असे सागर विचारतो. आदित्य इथं येतोय हे तुम्ही का लपवलं, कसलं कौन्सिलिंग सुरू आहे, असे सागर मुक्ताला जाब विचारतो. शाळेने त्याला कौन्सिलिंगसाठी पाठवले असल्याचे मुक्ता सांगते. सागर भावनेच्या भरात आदित्यला भेटण्यासाठी जात असतो. त्याच वेळी सागरचे वडील त्याला अडवतात आणि रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नकोस असे सांगतात.